बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने प्रवीणला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम या दोघांनी रचला होता. हा कट रचण्यात प्रवीण लोणकरचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रवीणला हत्येच्या दुसऱ्या दिवशी 13 ऑक्टोबरला पुण्यातून अटक केली होती.
सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या तीनपैकी दोन आरोपी उत्तर प्रदेशच्या बराइचचे असल्याची खातरजमा पोलिस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी केली आहे. एकाचे नाव धर्मराज असून दुसऱ्याचे शिवकुमार ऊर्फ शिवा असे नाव आहे. धर्मराज याला पोलिसांनी पकडले असून शिवा फरार आहे. दोघेही उत्तर प्रदेशातील गंडारा गावचे असून त्यांची घरेही आजूबाजूला आहेत. दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील असून ते पुण्यात भंगार विक्रेत्याचे काम करत होते. त्यांचे कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी रेकॉर्ड समोर आलेले नाही. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. हत्येबद्दल दोघांच्या कुटुंबीयांना काही माहिती होते का? याबाबतची चौकशी पोलीस करत आहेत.