
दादरच्या इंदू मिलमध्ये ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी बनवण्यात येत असलेली 25 फुटांची नमुना प्रतिकृती सदोष असल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र, सरकारने या नमुना प्रतिकृतीप्रमाणे पुतळा पूर्ण करण्याचा आणि आंबेडकरी जनतेवर लादण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीने राज्य सरकारला दिला आहे.
फोटोमधील समाजवादी पक्ष कार्यालयाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती स्मारकाच्या कामावर बारीक लक्ष ठेवणार आहे तसेच त्यात काही त्रुटी असतील तर त्या सरकारच्या लक्षात आणून देणार आहे. बैठकीला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने, दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, ओबीसी नेते राजाराम पाटील, लोकजनशक्ती पार्टीचे नेते रवी गरुड, समाजवादी पार्टीचे महासचिव राहुल गायकवाड, काँग्रेस नेते गणेश कांबळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड सुबोध मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव गायकवाड, प्रजासत्ताक जनता परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे, रिपब्लिकन सेनेचे कामगार नेते रमेश जाधवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी उभारण्यात येणाऱ्या नियोजित उत्तुंग पुतळय़ासाठी पहिल्यांदा 25 फुटांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. मात्र, यात अनेक त्रुटी असून असा सदोष पुतळा उभारू नका. हा बाबासाहेबांचा अपमान आहे, अशी भूमिका समितीने घेतली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. समितीची पुढील बैठक 14 फेब्रुवारीला होणार आहे.