आले गणराया, आता तरी रस्ते सुधारा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गासह सर्वच तालुक्यातील राज्य, ग्रामीण रस्ते खड्डेमय झाले असून या रस्त्यांवरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. या आतल्या मार्गांकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री कधी लक्ष देणार? असा प्रश्न वाहनधारकांसह ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असून महामार्गाच्या पाहणीसाठी शनिवारी जिल्ह्यात येणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आतल्या रस्त्यांची दखल घेणार का? असा सवाल उपस्थित करीत “आले गणराया आता तरी रस्ते सुधारा” असे साकडे जिल्हावासियांमधून घातले जात आहे. तसेच बांधकाम मंत्र्यांचा उद्याचा दौरा केवळ पाहणी दौरा न ठरता ठोस कार्यवाही करणारा ठरावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग दौऱ्यावर महामार्गावरील खड्ड्यांच्या पाहणीसाठी आले होते. मात्र त्यांचा हा दौरा अर्धवट राहीला. ओरोसमधून ते कोल्हापूरला रवाना झाले. त्यांचा हा दौरा अनेक गोष्टींनी चर्चेत राहीला. या दौऱ्याआधी संबंधित प्रशासन व ठेकेदाराने महामार्गावर अहोरात्र काम करीत युध्दपातळीवर खड्डे बुजवले. एरव्ही सिमेंट काँक्रीट, माती, जांभा दगडाने बुजविण्यात येणारे खड्डे पावसाळी डांबर वापरून मलपट्टी करण्यात आली. बांधकाम मंत्र्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न संबंधित प्रशासन व ठेकेदाराने केला.मात्र मंत्रीमहोदय झारापपर्यंत पाहणी न करता अर्ध्यावरूनच निघून गेले आणि बुजविलेले काही खड्डे पुन्हा उखडले तर काही ठिकाणी नव्याने खड्डे निर्माण झाले आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा केला जातो. यासाठी मुंबईकर चाकरमानी, गणेशभक्त मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्या गावी दाखल होत असतात.मात्र यंदा त्यांचा प्रवास खड्ड्यांतूनच होणार हे निश्चित आहे. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील शनिवार 8 सप्टेंबर रोजी पुन्हा सिंधुदुर्ग दौऱ्यावर महामार्गावरील खड्डे पाहणीसाठी येत आहेत.

मुंबई गोवा महामार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या कोकणात जोरात सुरु आहे. ठिकठिकाणी महामार्गावर खड्डे पडले आहेत. ठेकेदाराने प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष दिलेले दिसत नाही. अशा परिस्थितीत महामार्गावरील प्रवास धोक्याचा बनला आहे. त्यामुळे पाटील यांचा हा दौरा केवळ पाहणी दौरा न ठरता प्रत्यक्षात ठोस कार्यवाही करणारा ठरावा तसेच मंत्रीमहोदयांनी जिल्ह्यातील आतल्या रस्त्यांकडेही गांभीर्याने पाहावे अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त केली जात आहे.