बदलापूरमध्ये चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये अत्याचार, आरोपीला अटक

बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. येथे बुधवारी नर्सरीमध्ये शिकत असलेल्या चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी स्कूल बसचा चालकच असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुलगी शाळेतून घरी परतत असताना मिनी बसमध्ये चालकाने तिच्यावर अत्याचार केला. नेहमीच्या वेळेपेक्षा बस बुधवारी दुपारी उशिरा आल्याने पीडित मुलीची आई बसची वाट पाहत होती. बस दुपारी सुमारे १:३० वाजता मुलीच्या घराजवळ पोहोचली. मुलगी रडत-रडत बसमधून उतरली. यावरून मुलीच्या आईला संशय आला. घरी पोहोचल्यानंतर आई-वडिलांनी विचारल्यावर तिने हा प्रकार सांगितला. मुलगी भीतीने थरथरली आणि चालकाला बोलावले असता तो समोर आल्यावर ती आई-वडिलांच्या मागे लपली.

पालकांनी शाळा प्रशासनाकडे याची तक्रार केली, मात्र प्रशासनाने बस चालकाची बाजू घेत योग्य उत्तर दिले नाही. यामुळे संतापलेल्या पालकांनी बदलापूर वेस्ट पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरा तक्रार दाखल करून पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.