यंत्रणा षंढ, बदलापूरकरांचे लेकींसाठी बंड; भयंकर घटना, दोन चिमुकल्यांवर शाळेतच लैंगिक अत्याचार

भाजप आणि संघाशी संबंधित आदर्श विद्यालयातील संतापजनक प्रकार
मिंधे सरकार आणि फडणवीसांचं गृहखातं कुचकामी
‘लाडक्या बहिणी’ असुरक्षित, दीड हजार रुपये नको, सुरक्षा हवी!
कडकडीत बंद, आठ तास रेल रोको
फाशी… फाशी… फाशी…नराधमाला भरचौकात फाशी द्या! संतप्त पालकांची शाळेत तोडफोड
हजारो लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले, शहर ठप्प
पोलिसांच्या लाठीमाराने आंदोलन चिघळले, हिंसक वळण, आंदोलकांची दगडफेक
नागरिकांवर अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या
शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन महिला कर्मचारी निलंबित
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना निलंबित केले
राष्ट्रीय बालहक्क आणि मानवाधिकार आयोगाची मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालकांना नोटीस
तपासासाठी आयपीएस अधिकारी आरती सिंग यांची एसआयटी

मुंबई, ठाणे, महाराष्ट्रासह देशभरात महिलांवर एकापाठोपाठ एक होणारे अत्याचार आणि हत्यांच्या घटना ताज्या असतानाच बदलापुरात भाजपकडून चालवल्या जाणाऱ्या आदर्श विद्या मंदिर शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर शाळेतील शिपायानेच लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली. त्यातच शाळा व्यवस्थापनाची मुजोरी आणि पोलिसांनी न्यायासाठी पालकांना अकरा तास ताटकळत ठेवल्यामुळे या निर्घृण, पाशवी आणि अमानवी घटनेविरोधात बदलापूरकरांच्या संतापाचा अक्षरशः स्फोट झाला. शहर बंदची हाक देत बदलापूरवासीयांचे आग्या मोहोळ आज कोणाच्याही नेतृत्वाशिवाय हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. षंढ यंत्रणेविरोधात लेकीसाठी बंड करणाऱ्या बदलापूरकरांच्या मनात होती वेदना आणि कुचकामी मिंधे-फडणवीस सरकारविरोधात उद्रेक. त्यांनी शाळेवर धडक देत वर्गात घुसून तुफान तोडफोड केली. त्यानंतर त्यांचा मोर्चा रेल्वे स्टेशनवर वळला. तेथे ट्रकवर उतरत हजारो बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केले. ‘फाशी द्या… फाशी द्या… आरोपीला फाशी द्या…’, ‘मिंधे सरकार हाय हाय…’ अशा घोषणा देत आणि जिथे गुन्हा घडला तिथेच आरोपीला फाशी द्या, अशी मागणी करत रेल्वे स्टेशन परिसर दणाणून सोडला. त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार करणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या सात नळकांडय़ा फोडल्या, तरीही आंदोलक हटले नाहीत. तब्बल आठ तासांनंतर मंत्री गिरीश महाजन अवतरले. त्यांनी एक तास समजवण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांच्या रुद्रावतारामुळे त्यांना अक्षरशः पळ काढावा लागला. या आंदोलनामुळे बदलापूर, कर्जत, खोपोली लोकल सेवा ठप्प झाली. अखेर सायंकाळी 6 वाजता पोलीस, आरपीएफ, रेल सुरक्षा बलाच्या तुकडय़ांनी लाठीमार करून जमावाला पांगवले आणि आंदोलन तब्बल दहा तासांनी संपले. मात्र संपूर्ण बदलापूर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

अत्याचाराची तक्रार दाखल करायला पालकांना तब्बल 11 तास ताटकळत ठेवले

दोन चिमुकलींवर असा अमानुष अत्याचार घडूनही भाजपप्रणीत असलेल्या आदर्श शाळेच्या व्यवस्थापनाची मुजोरी आणि लपवाछपवी सुरूच होती. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी प्रेस नोट काढून  मुख्याध्यापिकांना निलंबित तर वर्गशिक्षिका आणि आयांना नोकरीवरून काढून टाकल्याचे सांगितले. मात्र या प्रेस नोटमध्ये निलंबित आणि कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची नावेच टाकली नाहीत. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या बदलापूरकरांना कोणतीही माहिती न देता ताटकळत ठेवले. शाळेची लपवाछपवी आणि पोलिसांच्या बेजबाबदारपणाविरोधात संतापाची ठिणगी पडली आणि बदलापूरकरांनी मंगळवारी शहर बंदची हाक दिली. सकाळी 7.30 वाजता हजारो बदलापूरकरांनी शाळेवर धडक दिली. शाळा व्यवस्थापनाविरोधात घोषणा देत कात्रप परिसर दणाणून सोडला. पालक आणि बदलापूरकरांचा संताप इतका शिगेला पोहचला की त्यांनी शाळेच्या गेटला धडक देऊन आत प्रवेश केला आणि वर्गात तोडफोड केली.

त्यानंतर हजारोंच्या जमावाने रेल्वे स्टेशनकडे कूच केली. सकाळी साडेदहा वाजता हजारो बदलापूरकरांनी रेल्वे स्थानकावर धडक देत रुळावर उतरून रेल रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात महिला आणि मुलेही उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. जमाव वाढत चालला तसा तणावही वाढत होता. सरकारविरोधात घोषणा देत बदलापूरकरांनी रेल्वे रुळावरच ठिय्या दिला. बाजूचे दोन्ही फलाट गर्दीने तुडुंब भरले होते. सर्वांच्या मनात होता तो सरकारी यंत्रणांच्या निष्क्रियतेविरोधात संताप. आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांची तुकडीही रुळावर उतरली. मात्र ही घृणास्पद घटना आणि ती दाबून टाकण्यासाठी शाळा व पोलीस यंत्रणांनी केलेली टाळाटाळ याविरोधात इतका प्रक्षोभ होता की, जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या सात नळकांडय़ा फोडल्या, परंतु आंदोलनकर्ते जागचे हलले नाहीत, उलट प्रत्येक तासागणिक जमाव वाढतच चालला होता. सरकारचे कुणीही प्रतिनिधी सकाळपासून फिरकले नसल्याने त्यांच्या संतापाचा पारा वाढतच चालला होता. घोषणा थांबत नव्हत्या आणि आंदोलनही संपत नव्हते.

नेमके काय घडले ?

बदलापूरमध्ये आदर्श विद्यालय ही भाजप आणि रा.स्व. संघप्रणीत शाळा आहे.

या शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या साडेतीन आणि चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुली स्वच्छतागृहात जात असताना शाळेतील अक्षय शिंदे या नराधम सफाई कर्मचाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना 12 ते 13 ऑगस्ट रोजी घडली.

पोटात  दुखत असल्याची तक्रार करत मुलींनी घडलेला घृणास्पद प्रकार घरच्यांना सांगितला. पालकांनी शाळेत धाव घेतली, परंतु शाळा व्यवस्थापनाने त्यांना दाद दिली नाही आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

पालकांनी बदलापूर पोलीस ठाणे गाठले, मात्र तेथेही पोलिसांनी त्यांना राजकीय दबावाखाली अनेक तास ताटकळत ठेवले. तुम्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करून आणा त्यानंतरच गुन्हा दाखल करू, अशी उर्मट उत्तरे पोलिसांनी पालकांना दिली.

पालकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या शहर संघटक दक्षता तांबे यांच्याकडे मदत मागितली. तांबे यांनी तत्काळ बालहक्क संरक्षण कक्षाला फोन लावून घडलेली घटना कळवली.

बालहक्क संरक्षण कक्षाच्या अधीक्षकांनी पोलीस आणि रुग्णालयाला याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची सूचना केली. त्यानंतर चिमुकलींची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

पालकांसह त्या चिमुकलींची अकरा तास झालेल्या फरफटीनंतर अखेर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याविरोधात 16 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे या स्वतः महिला असूनही त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

नराधमाला वाचवणारे भाजप कनेक्शन; चेतन आपटे यांनी सीसीटीव्ही फुटेजच नष्ट केले

ही विद्या प्रसारक शिक्षण संस्थेची शाळा असून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे नेते राम पातकर हे संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आहेत. भाजपच्या जनकल्याण समितीचे अंबरनाथ तालुकाध्यक्ष चेतन शरद आपटे हे या शाळेच्या संस्थेचे सचिव आहेत. चेतन आपटे यांनी नराधम अक्षय शिंदे याला वाचवण्यासाठी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले असा आरोप बदलापूरवासीयांनी केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले तेव्हा तांत्रिक बिघाड असल्याचे सांगून त्याचे फुटेज देण्यास नकार दिला. संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पालकांवर दबाव आणला. हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी संस्थेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या फोनाफोनीमुळेच पोलिसांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला.

भाजपचे आमदार किसन कथोरे म्हणतात, आंदोलक बाहेरचे, ही स्टंटबाजी

भाजपचे आमदार किसन कथोरे म्हणाले, आंदोलन करणारे लोक हे बदलापूरचे रहिवासी नाहीत. ही सगळी ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. आंदोलन सकाळीच भरकटले होते. आंदोलकांनी बदलापूरकरांना वेठीला धरले आहे. त्यांनी तयार केलेले बॅनर हे उल्हासनगर भागातून आले आहेत.

मिंध्यांचे वामन म्हात्रे महिला पत्रकाराला म्हणाले, तुझ्यावर बलात्कार झालाय का?

पत्रकार मोहिनी जाधव यांना मिंधे गटाचे माजी नगराध्यक्ष  वामन म्हात्रे यांनी रोखले. ‘बलात्कार झाला की विनयभंग झाला हे तू बघितले का?.. तू अशी बातमी करतेस की जसा काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ अशी मुजोरी म्हात्रे यांनी केली. याबाबत तक्रार देऊनही म्हात्रेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.

गिरीश महाजनांच्या तासभर मिनतवाऱ्या; तुमची मुलगी असती तर काय केले असते? महिलांचा सवाल

अखेर दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन हे बदलापूर रेल्वे स्थानकात पोहोचले. आंदोलन मागे घ्यावे यासाठी ते हात जोडून मिनतवाऱ्या करत होते, परंतु आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना महाजन यांची अक्षरशः दमछाक झाली. ‘‘आता आंदोलन मागे घ्या, आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करू’’ असे ते सांगत होते. मात्र ‘‘आरोपीला फाशी द्या. मग आम्ही इथून निघून जातो’’ असे जमावाने ठणकावून सांगितले. ‘‘तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केले असते?’’ असा सवालही आंदोलनकर्त्या महिलांनी महाजन यांना केला. त्यावर महाजन निरुत्तर झाले.

काय आहे जनतेच्या मनात?

भाजप सरकारची बेटी बचाओ योजना आहे की बेटी बचाके दिखाओ योजना आहे?

लेकी नेमक्या कोणत्या ठिकाणी सुरक्षित आहेत. तिचा नेमका दोष तरी काय आहे?

सगळी व्यवस्था नियमानुसार वागली असती, कर्तव्याला जागली असती तर हा उद्रेक झाला असता का?

शाळेने मुलींच्या टॉयलेटच्या देखभालीसाठी पुरुष कर्मचारी नेमलाच कसा?

पालकांची तक्रार दाखल करून घ्यायला पोलिसांना अकरा तास नेमके का लागले?

भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शाळा असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होता का?

चार दिवसांनंतर घटना समोर आली. संस्थाचालकांनी प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला का?

जमाव कसा आला, यावर बोलणार नाही – फडणवीस

जमाव स्वयंस्फूर्तीने आला की कसा आला याच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. भावनांचा उद्रेक असू शकतो. तिथे तात्काळ फाशीची मागणी केली जात आहे. पण, कायद्यानुसार जे तात्काळ करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. संवेदनशीलतेने काम करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ यासाठी प्रयत्न करायला हवा. ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. तरीही त्यामध्ये कोणीही दिरंगाई केली आहे का किंवा कोणी काही लपवले का याची चौकशी एसआटीमार्फत होणार आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तपासासाठी एसआयटी

तपासासाठी राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तीन पोलीस निलंबित

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणाऱ्या बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.