बदलापूर घटनेत दिरंगाई करणाऱ्या पोलीस, शाळा व्यवस्थापनावर कारवाई करा; अंबादास दानवेंनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट

बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच या घटनेत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणारे पोलीस आणि ती लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱया शाळा व्यवस्थापनावर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणात असुरक्षिततेची भावना समाजात आणि विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणीही अशाच घटना घडल्या. त्यामुळे राज्यात ‘लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी,’ अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली.

राज्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना या सरकार उघडय़ा डोळय़ाने बघत आहे. या घटना रोखण्यास पोलीस दल पुचकामी ठरले आहे. तसेच या घटना रोखण्यास महायुतीचे सरकारदेखील अपयशी ठरल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना केला. तसेच या घटनेवरून राजकारण सुरू आहे, असं म्हणणाऱया सत्ताधाऱयांना जनता उत्तर देण्यास शिवसेना सक्षम आहे, असेही ते म्हणाले.

या शिष्टमंडळात शिवसेना आमदार ऋतुजा लटके, उपनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, राजुल पटेल, शीतल देवरुखकर-शेठ, रंजना नेवाळकर, प्रवक्त्या संजना घाडी, युवासेना कार्यकारिणी सदस्या अॅड. गुरशीन काwर सहानी, धनश्री कोलगे, अश्विनी पवार, राजोल पाटील, दीक्षा कारकर, धनश्री विचारे आदींचा समावेश होता.