बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील नवनवीन खुलासे समोर येत आहेत. बदलापूर पीडित मुलीची आई गरोदर आहे. असे असताना त्यांना पोलीस स्थानक आणि रुग्णालयात 11 तास ताटकळत ठेवलं. यामुळे त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बदलापूर प्रकरणान नवनवीन खुलासे समोर येत आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार दोन पीडित मुलींपैकी एका पीडितेची आई दोन महिन्यांची गरोदर आहे. जेव्हा त्यांना कळाले की त्यांच्या मुलीवर अत्याचार झाला आहे तेव्हा त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. पण पोलीस स्थानकात पोलिसांनी लगेच तक्रार दाखल करून घेतली नाही. पीडित मुलीच्या आई तब्बल 11 तास या पोलीस स्थानक आणि रुग्णालयात ताटकळत बसल्या होत्या.
पीडित मुलीच्या एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार तक्रार दाखल केल्यानंतर मुलीच्या आईची तब्येत बिघडली. त्यांना 102 ताप आला होता आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मुलीला आधी वात्सल्य रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पण झाले. त्यानंतर मुलीला आम्ही शासकीय रुग्णालयात तपासाणीसाठी नेले. या सगळ्यात पीडित मुलीली आणि आईला खुप त्रास झाला अशी माहितीही या नातेवाईकाने दिली. पोलिसांनी या घटनेत कुठलेही गांभीर्य दाखवले नाही आणि तक्रार दाखल करायलाही खूप वेळ घेतला असा आरोपही या नातेवाईकाने केला आहे.
दुसरीकडे पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की तक्रार मिळाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणार हलगर्जीपणा केला असा आरोप होत होता. त्यामुळेच बदलापूरचे नागरिक चिडले आणि त्यांनी बदलापूर स्टेशनवर ठिय्या मांडला.
16 ऑगस्टला पीडीतेच्या पालकांनी तक्रार दाखल केली. त्याच दिवशी दुसऱ्या पीडीत मुलीच्या आजोबांनी आपल्या नातीवर अत्याचार झाल्याचे सांगितले. या दोन्ही मुली एकाच वर्गात शिकत होत्या. आपल्या नातीने गुप्तांगात दुखत असल्याची तक्रार केली आणि दादाने आपल्याला वाईट पद्धतीने स्पर्श केल्याचे सांगितले. दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांनीही तिची रुग्णालयाच चाचणी केली तेव्हा तिच्यावरही लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले.