नवरात्रोत्सवात सर्वत्र जगदंबेचा जागर सुरू असतानाच मिंधे गटाच्या उपविभागप्रमुखाने अकरा वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केला. संतापजनक म्हणजे या प्रकरणात अटक झाल्यानंतर नराधम सचिन यादव हा काही तासांतच जामिनावर सुटला असून तो मोकाट फिरत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडित चिमुकलीच्या माता-पित्यांनी न्यायासाठी आक्रोश करत शेकडो महिलांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन झालाच कसा, नेमकी कुणाच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी थातूरमातूर कलमे लावली, असा रोकडा सवालच लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी चिमुकली शुक्रवारी दुपारी ट्युशनला जात होती. तेव्हा मिंधे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव (55) याने त्या मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. त्यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीने त्या नराधमाला लांब ढकलले. त्यावेळी यादव याने अश्लील कृत्य केले. पीडित तरुणीने आपल्यासोबत झालेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटकदेखील केली. मात्र दुसऱ्या दिवशी त्याला जामीन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांवरील राजकीय दबावामुळेच थातूरमातूर कलमे लावल्याने यादवला जामीन मिळाल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणीदेखील होत आहे.
आरोपी 3 दिवसांपासून मोकाट
नराधमाला एकाच दिवसात जामीन मंजूर होतोच कसा, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणींनी सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला पुन्हा अटक करण्याची मागणी केली. नराधम मिंधे गटाचा उपविभागप्रमुख असून तो मोकाट फिरत असल्याने पीडित कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
पीडित कुटुंबीयांना धमक्या
एकीकडे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या उपविभागप्रमुखाला वेगळा न्याय का, असा सवाल संतप्त महिलांनी विचारला आहे. दरम्यान पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांना धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. तक्रार मागे घ्या अन्यथा तुमचे वाईट करू, अशा धमक्या येत असल्याने कुटुंबीय भीतीच्या छायेखाली आहेत.