उमर खालिद, शरजील इमामच्या जामिनावर आज होणार सुनावणी

दिल्लीतील फेब्रुवारी 2020 च्या दंगलीतील कथित कटाशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले उमर खालिद व शरजील इमाम यांच्यासह नऊ जणांच्या जामीन अर्जांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. याआधी खालिद व शरजील याने दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. या निकालाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर रोजी याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवले होते.  

काय आहे आरोप?

फेब्रुवारी 2020 मध्ये नागरिकत्व (सुधारणा) कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात झालेल्या निदर्शनांच्या वेळी दिल्लीत हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 53 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हिंसाचाराचे मास्टरमाइंड असल्याच्या आरोपाखाली खालिद, इमाम आणि इतर आरोपींवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा आणि पूर्वीच्या भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.