
अर्धी फ्रॅंकी खाऊन सुरतमार्गे गुवाहाटी मी पळून गेलो नाही. मी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलून पक्ष सोडला आणि मातोश्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लाईफटाईम शिवबंधन बांधले. पालकमंत्री उदय सामंत तुम्ही रत्नागिरीच्या विकासावर बोला. आज नागरिकांना चांगले रस्ते आणि २४ तास पाणी हवे आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले. ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.
बेईमानीचे बाळकडू उदय सामंत यांना मिळाले आहे. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मिंधे गुवाहाटीला गेले असताना शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत ते फ्रॅंकी खात होते. अर्धी फ्रॅंकी खाऊन ते ईडीच्या भीतीने पळाले. मी ४० वर्षे भाजपचे काम केले, अशी टीका बाळ माने यांनी केली.
माझ्या वडिलांनी जनसंघाचे काम केले. आमच्या माने कुटुंबियांनी संघाचे काम केले आहे. पण गेल्या काही वर्षात भाजपमध्ये जो बदल झाला आहे. जे काही इनकमिंग सुरू झाले आहे त्यामुळे मी नेते मंडळींना सांगून भाजप सोडला आहे. आता मी लाईफटाईम शिवबंधन बांधले आहे. अशा कडक शब्दात त्यांनी उदय सामंत यांना सुनावले. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे आणि युवासेनेचे जिल्हायुवाधिकारी प्रसाद सावंत उपस्थित होते.
सामंत शिंदेगट सोडून भाजपमध्ये जातील
उपनेते बाळ माने यांनी पलटवार करताना मी भाजपमध्ये जाणार नाही तिकडे सर्व हाऊसफुल झाले आहे. उलट काही दिवसांनी उदय सामंत शिंदे गट सोडून भाजपमध्ये जातील. त्यांनी शपथ घेऊन सांगावे की यापुढे मी कायम शिंदे गटातच राहिन असा टोला बाळ माने यांनी हाणला.
उदय सामंतचा लखोबा लोखंडे पेक्षा जास्त अभिनय
‘तो मी नव्हेच’ हे नाटक गाजले होते आजही त्याचे प्रयोग होतात. ’तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडे हे एक पात्र होते. त्या लखोबा लोखंडे पेक्षाही अधिक अभिनय उदय सामंत करत आहेत असा टोला उपनेते बाळ माने यांनी लगावला.


























































