निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने केलेल्या मतचोरीचा राहुल गांधींकडून भांडाफोड – बाळासाहेब थोरात

निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने केलेल्या मतचोरीचा राहुल गांधींकडून भांडाफोड केला, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. आज मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची कॉग्रेसची आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केलेले घोटाळे राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केले आहेत. देशातील लोकशाही धोक्यात असून ती वाचवण्याची गरज आहे आणि राहुल गांधी हे त्यासाठी लढत आहेत. या लढाईत देशातील सर्व विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे आहेत.”

महायुती सरकारवर टीका करत ते म्हणाले की, “राज्य सरकारमध्येही तिघांत वाद सुरु आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत. केंद्र व राज्य सरकारचा हा गैर कारभार जनतेपर्यंत पोहचवला पाहिजे. राज्यघटना व लोकशाही कशी धोक्यात आली आहे हे जनतेला सांगितले पाहिजे. पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, नवीन पालवी फुटली पाहिजे, काम करा पुन्हा काँग्रेसचे दिवस येणार आहेत.”