घातक शस्त्र घेऊन दरोडय़ाच्या तयारीत आलेल्या चौघांना वांद्रे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. सदाम सिद्दिकी ऊर्फ लल्लन, समीर शेख ऊर्फ डॉन, सागर सोनार आणि अमीर खान ऊर्फ गोऱ्या अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, चाकू, गुप्ती, दरोडय़ाचे साहित्य जप्त केले आहे. त्यांचे दोन साथीदार पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वांद्रे परिसरात काही जण दरोडय़ाच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. पोलिसांनी वांद्रेच्या लालमिटी परिसरात सापळा रचला. बुधवारी रात्री ते सहा जण तेथे आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले, तर दोन जण पोलिसांना धक्काबुक्की करून पळून गेले. ताब्यात घेतलेल्या त्या चौघांकडून पोलिसांनी पिस्तूल, गुप्ती, तलवार जप्त केली आहे. कसून चौकशी केल्यावर त्यांनी ते दरोडय़ाच्या तयारीत आल्याचे पोलिसांना सांगितले. सदामविरोधात ठाण्यात 17, समीर आणि अमीरविरोधात दोन, तर सागरविरोधात एक गुन्हा दाखल आहे. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.