घरच्या मैदानावर पाकिस्तानची नाचक्की, बांगलादेशने दिला ‘व्हाईटवॉश’, दुसरी कसोटी 6 विकेटने जिंकली

रावळपिंडीमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवाला आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. चौथ्या डावात पाकिस्तानने बांगलादेशपुढे विजयासाठी 185 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान बांगलादेशने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. यामुळे घरच्या मैदानावर पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश संघातील दोन्ही कसोटी सामने रावळपिंडीच्या मैदानावर खेळले गेले. पहिला सामना बांगलादेशने 10 विकेट्सनी जिंकला. या पराभवामुळे पाकिस्तानी क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती. आता दुसऱ्या कसोटीसह मालिकाही गमावल्याने अनेक खेळाडूंवर टांगती तलवार आहे.

दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसैन शांतो याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानचा पहिला डाव 274 धावांमध्ये गुंडाळला. त्यानंतर बांगलादेशचा डावही 262 धावांमध्ये आटोपला आणि पाकिस्तानला नाममात्र 12 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर बांगलादेशने टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानचा दुसरा डावही झटपट गुंडाळला. पहिल्या डावात 6 बाद 26 अशी अवस्था असताना शतकी खेळी करणारा लिटन दास याला सामनावीर, तर मेहदी हसन मिराज याला मालिकावीर पुरस्कार देऊ गौरवण्यात आले.

दरम्यान, बांगलादेशचा संघ 2000 पासून कसोटी खेळत आहे. तेव्हापासून बांगलादेशने आतापर्यंत फक्त चार वेळा द्विपक्षीय मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. पाकिस्तानआधी बांगलादेशने वेस्ट इंडिजला 2009 मध्ये 2-0 आणि 2018-19 मध्ये 2-0 असा, तर 2014-15 मध्ये झिम्बाब्वेचा 3-0 असा पराभव केला होता. तर 2022-23 मध्ये आयर्लंड, 2019-20 मध्ये झिम्बाब्वे आणि 2021 मध्येही झिम्बाब्वेचा एकमेव कसोटी मालिकेत पराभव केला होता.