बांगलादेशात आरक्षणाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराचा भडका उडाला असून गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. आज तर आंदोलक थेट पंतप्रधान निवासस्थानात आणि संसदेतही घुसले. राजधानी ढाकामध्ये तब्बल 4 लाख नागरिक रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी तोडपह्ड, जाळपोळ केली. आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर लष्कराने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी 45 मिनिटांचा अल्टिमेटम दिला. त्यानुसार राजीनामा देत त्यांनी देशाबाहेर पलायन केले.
गाझियाबादमध्ये डोवाल भेटले
शेख हसीना या आज सायंकाळीच बांगलादेशी लष्कराच्या हेलिकॉप्टरने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन तळावर उतरल्या. या वेळी हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेतली. सुमारे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली.
लष्करप्रमुख काय म्हणाले?
हसीना यांनी पलायन केल्यानंतर सत्तेवर लष्कराने नियंत्रण मिळवले असून लष्करप्रमुख जनरल वकार उझ झमान यांनी आम्ही आता अंतरिम सरकार स्थापन करू आणि आंदोलनात ज्यांची हत्या झाली आहे त्यांना न्याय मिळवून देऊ अशी घोषणा केली.
सीमेवर हायअलर्ट
बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाने हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. पेंद्र सरकारने हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर अनेक सैन्य तुकडय़ा पाठवल्या आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केल्याचे वृत्त आहे. बीएसएफचे महासंचालक कोलकात्यात दाखल झाले असून त्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला.
दोन दिवसांत बांगलादेशात अतिशय वेगाने घडामोडी घडल्याने आणि आरक्षणाविरोधातील हिंसाचार टिपेला पोहोचल्यामुळे देश अस्थिरतेकडे चालला आहे. देशभर हिंसाचार उफाळला असून अराजकतेची स्थिती आहे. सध्या देश लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे.