
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार सुरू आहे. तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर होत चालली आहे. सोमवारी आंदोलकांनी पंतप्रधान निवासात घुसून लुटमार केल्यानंतर तुरुंगाकडे धाव घेतली आणि 500 कैद्यांना पळवले. एवढेच नाही तर त्यानंतर इस्कॉन मंदिराकडे धाव घेत तोडफोड केल्याचे समोर येत आहे. पोलिसांचे एक पथक आंदोलकांना मंदिरातून बाहेर काढण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
बांगलादेशातील परिस्थितीवर हिंदुस्थान सरकारने सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यामध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशमधील स्थितीची माहिती दिली. बांगदेशची सध्याची परिस्थीती चिंताजनक आहे, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. बांगलादेशात संतप्त आंदोलकांनी हॉटेल पेटवून दिले. जेसोर परिसरात असलेल्या या हॉटेलला लागलेल्या आगीत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 80 हून अधिक जण होरपळले गेले. जे हॉटेल जाळण्यात आले ते शेख हसीना यांच्या पक्षाच्या नेत्या शाहीन चकलदार यांचे असल्याचे सांगितले जात आहे.
आंदोलकांनी 6 पोलीस स्टेशनला आग लावली आहे. तर चितगावातही 6 पोलीस ठाण्यांना आग लावली. पोलीस ठाण्यांना आग लावल्यानंतर आंदोलक शस्त्र आणि काडतूसे घेऊन पळाले. एवढेच नाही तर हसीना यांच्या पक्षातील नेत्यांच्या घरांना लक्ष्य केले जात आहे. त्यानंतर परिसरात तणावाची परिस्थिती होती. अनेक मंदिरांची तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली आहे.