
किन्हवली येथील बँक ऑफ बडोदाचे एटीएम तीन वर्षांपासून बंद असल्याने ग्राहकांची चांगलीच कुचंबणा होत आहे. बँकेच्या या अजब कारभारामुळे ग्राहक संतापलेले असून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना अनेक मैलावर असलेले एटीएम गाठण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, वारंवार तक्रार करूनदेखील बँक व्यवस्थापनाकडून ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत.
शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरच्या प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्त्यालगत बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. साधारण दहा ते बारा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाखेचे कामकाज सुरुवातीला अत्यंत सुरळीत सुरू होते. ग्राहकांना तत्काळ सेवा देण्यात बँक ऑफ बडोदा शाखेचे नावलौकिक झाल्याने अनेकांनी आपले खाते या शाखेत उघडले होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून बंदच असल्याने पैसे काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, सरकारी कर्मचारी तसेच निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर एटीएम सेवा सुरू करण्यात यावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात शाखेच्या नूतनीकरणाचे काम होताच नवीन एटीएम केंद्र सुरू होईल असे शाखा व्यवस्थापनाने सांगितले.
























































