
बँकेतील पैसे सुरक्षित असतात असा एक समज आहे. अर्थात हे खरेही आहे. मात्र अनेकदा बँकेतील कर्मचारी खातेधारकांच्या पैशांचा दुरुपयोग करत असल्याचे समोर आले आहे. यावर ‘लकी भास्कर’ नावाचा एक चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला. आता या चित्रपटातील कथेला साजेसाच धक्कादायक प्रकार राजस्थानमधील कोटा येथे समोर आला आहे.
कोटी येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील एका महिला अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत तब्बल 4 कोटीहून अधिक रक्कमेचा झोल केला आणि हे पैसे शेअर बाजारामध्ये गुंतवले. दोन वर्ष हा प्रकार सुरू होता, मात्र याचा कुणालाही सुगावा लागला नाही. आता हे प्रकरण समोर आले असून यामुळे सर्वांनाच धक्का बसला. साक्षी गुप्ता असे आरोपी महिला अधिकाऱ्याचे नाव असून तिला अटकही करण्यात आली आहे.
साक्षी गुप्ता ही आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर या पदावर कार्यरत होती. तीने यूजर एफडी लिंकचा गैरवापर करत 2020 ते 2023 या काळात तब्बल 41 ग्राहकांच्या 110 खात्यांमधून 4.58 कोटी रुपये काढले. साक्षी गुप्ताने हे सर्व पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने एफडीतील पैसे ती परत जमा करू शकली नाही आणि तिची पोलखोल झाली. या प्रकरणी पोलिसांनी तिला तिच्या बहिणीचा लग्न सोहळा सुरू असतानाच अटक केली. सध्या तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
झोल उघड कधी झाला?
साक्षी गुप्ता हिने 110 खात्यातून 4.50 कोटीहून अधिक रक्कम काढली होती. एक ग्राहक आपल्या एफडीबद्दल विचारपूस करण्यासाठी बँकेत गेला तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला. साक्षीने पैशाच्या व्यवहारांचे संदेश ग्राहकांना पोहोचू नये म्हणून खात्याशी जोडलेले फोन नंबरही बदलले होते. तसेच खातेधारकांना फसवणुकीची कल्पना येऊ नये म्हणून साक्षीने सिस्टिमवर ओटीपी मिळवण्यासाठी एक प्रणालीही तयार केली होती, अशी माहिती तपास अधिकारी इब्राहिम खान यांनी दिली.