मतदारांनी ट्रम्प यांचा अजेंडा नाकारला, ममदानींच्या विजयाने ओबामा आनंदी

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ममदानी यांचा विजय आणि व्हर्जिनिया, न्यूजर्सी, कॅलिफोर्नियात झालेल्या विजयामुळे अमेरिकेतील मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा नाकारला आहे, असे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. ओबामा यांनी पॉड सेव अमेरिका नावाच्या पॉडकास्टसाठी आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतला होता.

यात ते बोलताना म्हणाले की, अमेरिकेत झालेल्या निवडणुकीतील निकाल मनाला आनंद देणारे आहेत. हे चांगले संकेत आहेत की, अमेरिकेतील जनता सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहे. अमेरिकेतील जनतेला निर्दयता नकोय, सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे लोक जनतेला नको आहेत, असे ओबामा म्हणाले. न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत समाजवादी म्हणणाऱ्या जोहरान ममदानी, व्हर्जिनिया आणि न्यूजर्सीच्या गव्हर्नरच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीचे स्पेनबर्गर व मिकी शेरिल यांचा विजय झाला आहे. पक्षाला हे विजय मिळाले असले तरी डेमोक्रॅटिक पार्टीत बरेच काम करायचे बाकी आहेत, असे ओबामा यावेळी म्हणाले.