
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला दोन आठवडे उलटले असतानाही दुर्घटनेच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी कायम आहे. अपघाताचे अवशेष हटवून परिसर सपाट करण्यात आला असला, तरी हे ठिकाण आता अनेकांसाठी एक भावनिक स्मृतीस्थळ बनले आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. बारामतीतील प्रशिक्षण एअरस्ट्रीपच्या काठावर असलेल्या या ठिकाणी दिवसभर लोकांची वर्दळ दिसत आहे. काही जण जवळच्या गावांतून येतात, तर काहीजण शेकडो किलोमीटरचा प्रवास करून केवळ अपघातस्थळ पाहण्यासाठी पोहोचत आहेत.
लोकांचे छोटे-मोठे गट सतत येत आहेत. काहीजण गाड्या आणि दुचाकी एअरफिल्डवरून चालवत येतात, तर काहीजण परिघातून पायी चालत दूरवरच्या जागेपर्यंत पोहोचतात. बारामती आणि आसपासच्या गावांमधील लोकांसोबत दूरवरून आलेले नागरिकही येथे दिसतात.
या ठिकाणी आल्यानंतर लोकांमध्ये विविध चर्चा रंगतात. काहीजण अपघाताबाबत वेगवेगळ्या शक्यता आणि तर्क मांडताना दिसतात. “ती मुलगी चांगली विमान चालवत होती,” असे एकजण प्रथम अधिकारी शांभवी पाठक यांचा उल्लेख करत म्हणतो. तर दुसरा नागरिक प्रशिक्षणासाठी येणारी विमाने सहज उतरतात, मग ‘दादांचे’ विमान कसे कोसळले, असा प्रश्न उपस्थित करतो.
मालेगाव बुद्रुक येथील नितीन घुसळकर पत्नी आणि मुलीसह येथे आले होते. “अपघाताच्या दिवशी पोलिसांनी परिसर बंद केला होता, त्यामुळे आज आलो. अजूनही ‘दादा’ गेले यावर विश्वास बसत नाही,” असे ते म्हणाले.
कुसगाव खुर्द येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कुंदलिकलाल घुडे मित्रासह सुमारे 150 किलोमीटरचा प्रवास करून येथे पोहोचले. “दादांवर खूप प्रेम आहे. स्वतः येथे येऊन पाहावे, अशी इच्छा होती. हे दृश्य पाहून खूप वाईट वाटते,” असे त्यांनी सांगितले.
अनेकजण फक्त ठिकाण पाहून थांबत नाहीत. काहीजण छोट्या दगडांनी जमिनीत खणून विमानाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काहीजण नातेवाईकांना अपघात कसा झाला, याची माहिती देत त्या जागेभोवती कथन करताना दिसतात.
एअरस्ट्रीपलगत शेत असलेले रघो आटोळे, जे बचावकार्यावेळी उपस्थित होते, ते त्या दिवसाच्या आठवणी सांगतात. “अपघातानंतर काही मिनिटांतच मी येथे पोहोचलो. आधी दोन मृतदेह बाहेर काढले. नंतर ट्रॅक्टरने विमान हलवल्यानंतर उर्वरित तीन मृतदेह बाहेर काढले. मृतदेह पूर्णपणे जळाले होते,” असे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या अनेकांकडे अजित पवार यांच्यासोबत काढलेले फोटोही दिसतात. काहीजण मोबाईलमधील जुने सेल्फी दाखवत आपल्या आठवणी सांगतात. पुण्याहून आपल्या गावात आलेल्या वैशाली खरे यांनी सांगितले की, अपघातस्थळ पाहिल्यानंतर त्या विद्याप्रतिष्ठान येथे श्रद्धांजली वाहणार आहेत. “पवार कुटुंब आमच्यासाठी कुटुंबासारखेच आहे. आठ दिवस विश्वासच बसत नव्हता. म्हणून स्वतः येऊन पाहावे, असे वाटले,” असे त्या म्हणाल्या.
शिरूर येथील सचिन दासगुडे, विजय म्हस्के आणि मिलिंद शेळके हे मित्र 90 किलोमीटरचा प्रवास करून आले होते. ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी संबंधित असले तरी अजित पवारांविषयीचे प्रेम कायम असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील आयटी क्षेत्रातील रवीराज चव्हाण आणि चैत्यन्य कांबळे हे दोघेही बारामतीचे मूळ रहिवासी असून दुसऱ्यांदा येथे आले होते. “दादांच्या आठवणींसाठी आलो,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काही ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या आणि टाकाऊ वस्तूंचा कचरा दिसत असल्याने या ठिकाणाचे रूपांतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होण्याची भीती व्यक्त होत आहे. बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी सांगितले की, अपघातानंतर पाच दिवस विमानतळ बंद ठेवण्यात आला होते. 2 फेब्रुवारीपासून प्रशिक्षण अकॅडमींना नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. मात्र खासगी व्यावसायिक उड्डाणांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
दरम्यान, अपघातस्थळाच्या वरून प्रशिक्षण विमाने नियमित उड्डाण करत असून बारामतीत दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. तरीही अनेकजण या ठिकाणी येत राहून ‘दादांच्या’ आठवणींना उजाळा देत आहेत.





























































