बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबूराव डिसले यांनी सभापती व सदस्य असताना भ्रष्ट मार्गाने सुमारे 10 कोटी रुपयांची संपत्ती जमविल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाची प्राथमिक चौकशी होऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनिल बाबूराव डिसले, पत्नी संगीता डिसले, मुलगा सागर व स्वप्नील या चौघांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बार्शी तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी येथे राहणारे अनिल बाबूराव डिसले हे बार्शी पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य असताना भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवून कुटुंबीयांच्या नावे ठेवल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीच्या चौकशीत
डिसले कुटुंबाकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा ४७० टक्के इतकी भ्रष्ट संपत्ती आढळली. प्राथमिक चौकशीत अनिल डिसले, संगीता डिसले, मुलगा सागर डिसले व स्वप्नील डिसले दोषी आढळले असून, त्यांच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात डिसले कुटुंबाकडे ९ कोटी ६९ लाख पाच हजार रुपये इतकी अवैध संपत्ती आढळली आहे. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करीत आहेत.