कोकणात रिफायनरीनंतर आता बॉक्साईट प्रकल्प; नाणारपाठोपाठ सागवे घोडेपोईवाडीत होणार उत्खनन

प्रातिनिधिक फोटो कोकण

नाणारपाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडी येथे अजून एका बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची घोषणा राज्य शासनाने केली असून या प्रकल्पासाठीची पर्यावरण जनसुनावणी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कात्रादेवी मंगल कार्यालय, कात्रादेवी, सागवे येथे होणार आहे. रिफायनरी प्रकल्पाची प्रतीक्षा करता करता आता समुद्रकिनारपट्टी पोखरणारे बॉक्साईट उत्खननाचे प्रकल्प राजापूर तालुकावासीयांच्या माथी मारले जात असल्याने याचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे.

नाणार परिसरातील सुमारे 145 हेक्टरवर होणाऱया बॉक्साईट उत्खननाच्या प्रकल्पाची जनसुनावणी 29 ऑगस्ट 2024 रोजी नाणार येथे होणार आहे. त्याबाबतची जाहीर नोटीस शासनाने प्रसिद्ध करून आठवडय़ाचा कालावधी लोटण्याअगोदरच आता शासनाने सागवे घोडेपोईवाडी येथे प्रस्तावित असणाऱया दुसऱया बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या जनसुनावणीची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर या भागात रिफायनरीच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा बॉक्साईट उत्खननविरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.

कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आणा, येथील निसर्गाची हानी करणारे प्रकल्प आम्हाला नकोत अशी मागणी येथील जनतेची असताना आता संपूर्ण कोकणपट्टी पोखरणारे प्रकल्प या परिसरात येऊ घातल्याने जनक्षोभ उसळण्याची दाट शक्यता आहे. सागवे हमदरा घोडेपोईवाडी येथे 120.48 हेक्टरवर हा बॉक्साईट उत्खनन प्रकल्प प्रस्तावित असून मे. गामा आर्यन इंडिया लिमिटेड, रत्नागिरी ही पंपनी या ठिकाणी बॉक्साईटचे उत्खनन करणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक कार्यालय, रत्नागिरी यांनी याबाबतची जाहीर नोटीस 3 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्राने ग्रामपंचायत सागवे यांना पाठवली आहे.

परिसरात तीव्र असंतोष

भारत सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाने 14 सप्टेंबर 2006 रोजी या प्रकल्पाची अधिसूचना काढलेली असून सावगे, हमदारे, घोडेपोईवाडी येथील 120.48 हेक्टर क्षेत्रावर प्रतिवर्ष 0.3 मेट्रिक टन इतके उत्खनन करण्यात येणार आहे. गणपती आगमनाच्या अगोदर दोन दिवस जाहीर झालेल्या या जन सुनावणीमुळे या परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.