
आशिया चषक 2025 साठी हिंदुस्थानची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार आहे. गिलच्या निवडीवरून वाद सुरू असतानाच आशिया चषकात हिंदुस्थान 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार यावरून टीका सुरू झाली आहे. याबाबत आता माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून खेळाडूंवर टीका करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर आशिया चषकावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत हिंदुस्थानच्या अनेक खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही देशातील सामनाही रद्द झाला होता.
आता आशिया चषकातही हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी होत आहे. मात्र हा निर्णय सरकारचा असून खेळाडू यात हस्तक्षेप करू शकत नाही. खेळाडू फक्त बीसीसीआय आणि केंद्र सराकरच्या सूचनांचे पालन करतात, असे गावस्कर यांनी म्हटले आहे. सरकारने जर निर्णय घेतला असेल, तर खेळाडूंवर टीका करण्याचा काहीही प्रश्नच नाही. कारण खेळाडू बीसीसीआयशी करारबद्ध असतात आणि त्यांना केंद्र सरकारकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागते. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे सरकारवर अवलंबून असतो, असे गावस्कर म्हणाले.
खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार द्यावा का? असे विचारले असता गावस्कर म्हणाले की, हा निर्णय पूर्णपणे केंद्र सरकारवर अवलंबून आहे. सरकार बीसीसीआयला काय करायचे ते सांगेल. या प्रकरणात खेळाडू अगदी असहाय्य आहेत. त्यांची निवड आशिया चषकासाठी झाली आहे. सरकार म्हणेल खेळायचे आहे, तर त्यांना खेळावे लागेल. सरकारने जर न खेळण्याचा आदेश दिला, तर बीसीसीआय त्याप्रमाणे कारवाई करेल, असेही गावस्कर यांनी स्पष्ट केले.
अय्यरवर अन्याय झालाय! आशिया कप संघातून वगळल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या पाठीशी
दरम्यान, 9 सप्टेंबर पासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. हिंदुस्थान आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळेल. त्यानंतर 14 सप्टेंबरला हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगणार आहे. तर गटातील शेवटचा सामना हिंदुस्थान 19 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध खेळेल.