
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या रोमहर्षक किताबी लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जगज्जेतेपदाचा 17 वर्षांचा दुष्काळ संपविला. खेळाडूंच्या सांघिक कामगिरीवर खूश होऊन ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी जगज्जेत्या हिंदुस्थानी संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली.
सोशल मीडियाच्या ‘एक्स’ अकाऊंटवरून ही बक्षिसाची घोषणा करताना जय शहा म्हणाले, ‘यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधील जगज्जेत्या टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करताना मला आनंद होत आहे. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी संपूर्ण स्पर्धेत अद्भुत कामगिरी, दृढ संकल्प अन् जबरदस्त कौशल्याच्या जोरावर वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरले आहे. या संस्मरणीय कामगिरीबद्दल संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व सहयोगी स्टाफ या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो.’