आयसीसीतही हिंदुस्थानची दादागिरी, बीसीसीआय सचिव जय शहा बिनविरोध आयसीसीच्या अध्यक्षपदी

बीसीसीआयमध्ये जय शहा यांची दादागिरी चालायची. आता ती दादागिरी आयसीसीमध्येही चालणार आहे. विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर जय शहा हेच आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष होणार असल्याचे संकेत मिळाले होते आणि अखेर ते प्रत्यक्षात अवतरले. अध्यक्षपदाचा अर्ज भरून ते बिनविरोध निवडून आले आहेत. आता पुढील दोन वर्षे जागतिक क्रिकेटप्रमाणे आयसीसीवरही हिंदुस्थानचेच राज्य असेल.

हिंदुस्थानच्या जगमोहन दालमिया, शरद पवार, शशांक मनोहर, एन. श्रीनिवासन या दिग्गजांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे. विशेष म्हणजे या दिग्गजांना वयाची साठी गाठल्यानंतर अध्यक्षपदी विराजमान होता आले होते तर जय शहा यांनी 35 व्या वर्षीच हे संपादले आहे. ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. जय शहा यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यांना सर्वच संघटनांचा पाठिंबा होता. पण अध्यक्षपदासाठी अन्य पुणीही अर्ज न भरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.

आयसीसीमध्ये अध्यक्षपदाच्या अधिक निवडणुका बिनविरोधच होतात. 2014 पर्यंत आयसीसीमध्ये कार्याध्यक्ष (प्रेसिडेंट) हे पद होते. त्यानंतर घटनेत बदल करत ते अध्यक्ष (चेअरमन) करण्यात आले. त्यानुसार जय शहा हे आयसीसीचे 16 वे अध्यक्ष आहेत. बार्कले यांचा कार्यकाल 30 नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे ते 1 डिसेंबरपासून आयसीसीचे अध्यक्षपद भूषवतील.

पाकिस्तानला धडकी भरली

पुढच्या वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे, मात्र या स्पर्धेत हिंदुस्थानी संघाच्या समावेशाबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही भूमिका व्यक्त केलेली नाही. त्यातच बीसीसीआयचे सचिव असलेले जय शहा आता आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या भूमिकेत आले आहेत. बीसीसीआयचे सचिव म्हणून त्यांनी आधीच पाकिस्तानात खेळणार नसल्याचे सांगितले आहे. आता आयसीसी अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांची तीच भूमिका कायम राहिली तर चॅम्पियन्स ट्रॉफीची जोरदार तयारी करणाऱ्या पीसीबीला जबर हादरा बसू शकतो. आधीच पीसीबीचे प्रकरण आयसीसी अध्यक्षांकडे प्रलंबित आहेत आणि शहा अध्यक्ष झाल्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहा यांच्या जागी जेटली

अमित शहा यांचे राजकीय वजन असल्यामुळे जय शहा यांची 2019 साली बीसीसीआयच्या सचिवपदी वर्णी लागली होती. आता ते आयसीसीचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागणार आहे आणि त्यांच्या जागी पुन्हा एकदा राजकीय वजन असलेले दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली विराजमान होणार आहे. ते सध्या दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. यानिमित्ताने भाजपची घराणेशाही क्रिकेटमध्येही पोहोचली आहे.

क्रिकेटला आणखी लोकप्रिय करायचेय

आयसीसीच्या अध्यक्षपदी निश्चित झाल्यानंतर जय शहा यांनी क्रिकेटला आणखी लोकप्रिय करण्याचे आयसीसीचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. 2028 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे म्हणजेच क्रिकेटची प्रगती दर्शवतेय. ऑलिम्पिक प्रवेशानंतर क्रिकेट हा आणखी लोकप्रिय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटना आणि त्यांच्या अस्तित्वाला संतुलित करणार असल्याचे सांगितले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत क्रिकेटला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.