बीसीसीआय होणार आणखी श्रीमंत, जर्सी प्रायोजकत्वाचे दर वाढवल्यामुळे बीसीसीआयच्या तिजोरीत 400 कोटींची भर

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱया बीसीसीआयने  हिंदुस्थान संघाच्या जर्सी प्रायोजकत्वाचे दर झपाटय़ाने वाढवले आहेत. आता द्विपक्षीय मालिकांसाठी जर्सी प्रायोजकांना प्रति सामना तब्बल 3.5 कोटी रुपये आणि बहुपक्षीय स्पर्धांसाठी 1.5 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या नव्या दरांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) मान्यता देणार आहेत. यापूर्वी द्विपक्षीय सामन्यासाठी 3.17 कोटी रुपये आणि बहुपक्षीय सामन्यासाठी 1.12 कोटी रुपये आकारले जात होते. त्यामुळे दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

आशिया कपमध्ये जर्सीवर नसेल मुख्य प्रायोजक

9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱया एशिया कप स्पर्धेत टीम हिंदुस्थान कोणत्याही मुख्य जर्सी प्रायोजकाशिवाय मैदानात उतरणार आहे. कारण नवे करार आशिया कपनंतरच लागू होतील.

बीसीसीआयने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, जर्सी प्रायोजक कोणत्याही प्रकारे ऑनलाइन मनी गेमिंग, सट्टेबाजी किंवा जुगार यामध्ये गुंतलेला असू नये तसेच हिंदुस्थानात अशा सेवांचे थेट किंवा अप्रत्यक्ष प्रोत्साहन देऊ नये.

या निर्णयामुळे टीम हिंदुस्थानच्या जर्सीवर जाहिरातींचे दर इतिहासातील सर्वाधिक झाले असून, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आणखी श्रीमंत होणार हे निश्चित झाले आहे.

400 कोटींपेक्षा अधिक कमाईची शक्यता

नव्या दरांमुळे बीसीसीआयला प्रति वर्ष 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, मात्र बोलीच्या अंतिम निकालावर हा आकडा आणखी जास्तही ठरू शकतो. बीसीसीआयने मंगळवारी नव्या मुख्य प्रायोजकासाठी बोली मागवली असून त्यासाठीची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे.

 

ड्रीम 11 करार रद्द

ऑनलाइन गेमिंग संवर्धन व विनियमन अधिनियम 2025 लागू झाल्यानंतर बीसीसीआयने टीम हिंदुस्थानचा प्रमुख जर्सी प्रायोजक ‘ड्रीम 11’चा करार रद्द केला. या अधिनियमानुसार प्रत्यक्ष पैशाशी संबंधित ऑनलाइन गेमिंग सेवा, त्यांचे जाहिरात किंवा प्रोत्साहन यावर पूर्ण बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे ड्रीम 11ने बाजारातून माघार घेतली.