
सध्या अनेक जण सर्रास क्रेडिट कार्डचा वापर करतात. त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. परंतु एक छोटीशी चूक महागात पडू शकते. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते. क्रेडिट कार्ड वापरता काही चुका टाळल्यास आर्थिक भुर्दंडापासून दूर राहता येईल. क्रेडिट कार्डचा वापर करताना निष्काळजीपणा केल्याने अनेक जण कर्जाच्या सापळ्यात अडकले आहेत. कमाईपेक्षा जास्त खर्च होणार नाही, याची काळजीसुद्धा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.
हे ध्यानात ठेवा…
- क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करू नका. यामुळे तुमचा सिबील स्कोअर खराब होऊ शकतो.
- क्रेडिट कार्डमधून पैसे काढू नका. यामुळे लगेच व्याज, इतर शुल्क जमा होण्यास सुरुवात होईल.
- बिल पेमेंट करण्यास उशीर करू नका. कारण यामुळे व्याज वाढते आणि तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.
- स्टेटमेंट वाचल्याशिवाय कधीही पेमेंट करू नका. यामुळे चुकीचे शुल्क आणि फसवणूक होण्यापासून दूर राहता येईल.
- रिवॉर्ड पॉइंट्स आणि ऑफर्सच्या लोभात गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका. यामुळे बजेट बिघडू शकते.
- प्रत्येक खरेदीवर ईएमआय ऑप्शन निवडू नका. यामुळे हळूहळू कर्जाचा बोजा वाढू शकतो.
- कार्ड क्रेडिट मर्यादा आणि खर्चावर लक्ष ठेवा. अनावश्यक खरेदी टाळा.
- दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्याला तुमचा क्रेडिट स्कोअर तपासत रहा.
- थकबाकीची रक्कम वेळेवर परत केल्यास कोणतेही व्याज आकारले जात नाही. वेगवेगळ्या बँका यासाठी वेगवेगळ्या वेळेच्या मर्यादा देतात.
- जर व्याजदर, उशिरा पेमेंट, दंड यांसारख्या गोष्टी समजत नसतील तर क्रेडिट कार्ड वापरणे टाळा.