सातबहिणीच्या डोंगरावर मधमाश्यांचा हल्ला, नवस फेडण्यासाठी आलेले चार भाविक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील प्रसिद्ध सातबहिणीच्या डोंगरावर नवस फेडण्यासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला चढविल्याची घटना घडली. या हल्ल्यात चार भाविक जखमी झाले असून जखमींमध्ये तीन वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

चाचरकर कुटुंबातील काही सदस्य मुलीचा नवस फेडण्यासाठी सातबहिणीच्या डोंगरावर गेले होते. पूजा सुरू असतानाच अचानक मधमाश्यांचा थवा त्या परिसरात आला आणि भाविकांवर हल्ला चढविला. या घटनेत पुजारी विठ्ठल चाचरकर (55), नत्थू चाचरकर (62), कविता चाचरकर (52) आणि सायली चाचरकर (3) हे जखमी झाले. जखमींना तातडीने गोविंदपूर व तळोधी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलीस ठाण्याचे ठाणेदार व वनपरिक्षेत्राधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य राबवून जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढले.