ओबीसी आरक्षण गेले, आता नातवाला नोकरी लागणार नाही; आजोबांनी जीवन संपवले

ओबीसी समाजाचे आरक्षण आता गेले आहे, आता आपल्या लोकांना व नातवाला नोकरी लागणार नाही या समजूतीतून मानसिक रुग्ण असलेल्या आजोबांनी बाभळीच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे घडली आहे.

आरक्षणबाबत गावागावात आणि समाजा समाजात पारावर, चावडीवर चर्चा सुरू असतात. या चर्चेतूनच ओबीसीचे आरक्षण आता गेले आहे. ओबीसीच्या लोकांना आता विशेष म्हणजे आपल्या नातवाला नोकरी लागणार नाही असा समज करून घेतलेल्या निवृत्ती पांडुरंग यादव (55, रा.बर्दापूर, ता.अंबाजोगाई, जि.बीड) यांनी पहाटे केव्हातरी आपल्या शेतातील झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मुलगा दिनेश निवृत्ती यादव याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. बर्दापूर पोलीस ठाण्याकडून तपास सुरू आहे.