
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून दिवसाढवळय़ा त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दांत निषेध होत आहे. याच अनुषंगाने बीड जिल्हावासीयांच्या वतीने शुक्रवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
बीड जिह्यामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी याला कुठेतरी आळा बसावा, प्रशासनाला जाग यावी या सर्व बाबींच्या अनुषंगाने हा बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सकल मराठा समाजासह बीड जिल्हाकरांच्या वतीने करण्यात आले आहे. जर लोकप्रतिनिधींची हत्या दिवसाढवळ्या होत असेल तर जिह्यातील चित्र काय आहे, हे लक्षात येते.
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडांवर खंडणीचा गुन्हा
पवनचक्की पंपनीच्या अधिकाऱयाला दोन कोटी रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनचक्की पंपनीच्या कार्यालय परिसरात झालेल्या वादातूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यासोबत विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यावरही खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अवादा एनर्जी पंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंपनीचे काम सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.