बीडमध्ये गुन्हेगारीचा उद्रेक! पोलीस मात्र हातभट्टीवर धाड टाकून शाब्बासकी मिळवतायंत

38

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. गुन्हेगारीचा उद्रेक झाला आहे. जिल्हाभरात स्फोटक घटना घडत आहेत. चोऱ्या, लुटमार सह खून, बलात्कार, जाळपोळ अशा घटनांनी भीतीचे वातावरण पसरले आहे. बनावट कट्टे सापडत आहेत. पोलीसांचा धाक नेमका कोणावर असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे गंभीर घटना घडत असताना पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक किरकोळ कारवाई करत पाठ थोपटून घेत असतात.

बीड शहरासह संपूर्ण जिल्हा गुन्हेगारांच्या हातात दिला की काय असा प्रश्न आता निर्माण होवू लागला आहे. गेल्या चार महिन्यापासून गंभीर घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. गेवराईतील हत्याकांड असो की बीडमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण असो. रोज गंभीर घटना घडत आहेत. चोरी, लुटमार नित्याचेच झाले आहे. घरासमोरील वाहनं जाळण्याचे सत्रही सुरू झाले आहे. चैनचोर आणि खिसेकापूंनी उच्छाद मांडला आहे. परळीत पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने महिलेला जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा घटनांनी खाकीवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रात्री बीडमध्ये गुजराथी कॉलनीमध्ये समाधान सरगुले या व्यापाऱ्याच्या घरात अज्ञात चोरटय़ांनी प्रवेश करून ७७ हजार रूपयाचा ऐवज लंपास केला. दोन दिवसापूर्वी उत्पादन शुल्क अधिकारी नितीन धार्मीक यांच्या घरीही चोरटय़ांनी हात साफ करत ३४ हजाराचा ऐवज लंपास केला. भरदिवसा सोमवारी दुपारी साडेबारा वाजता बीडच्या बसस्थानकावर उमाकांत तागड हा प्रवाशी बीडमध्ये चढत असताना खिशातील ५० हजार रूपये खिसे कापून लंपास करण्यात आले. तर बिंदुसरा कॉलनीतील घरासमोर उभी असणारी एक क्रुझर जीप आणि दुचाकी जाळण्यात आली. या घटनांनी संपूर्ण शहर भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. बनावट कट्टय़ामधून फैरी झाडल्या आहेत.

गेवराईत रोडरॉबरीची घटना नुकतीच घडली आहे. नित्रुडमध्ये भरदिवसा पाठलाग करून एकाचा निर्घुण खून करण्यात आला अशा घटना सतत घडत असताना पोलीस प्रशासन नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. पोलीसांचा धाक राहिला नाही. गुन्हेगारीने जिल्हा हादरून जात असताना पोलीस प्रशासन मात्र हतबल झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अशा गंभीर घटनांनी जिल्हा भयभीत होत असताना पोलीस अधीक्षकांचं विशेष पथक कोठेतरी किरकोळ स्वरूपाची धाड टाकतात. दोन चार हजार रूपयाचा माल जप्त करतात आणि स्वतःची पाठ थोपटून घेतात. अशी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये पाहाण्यास मिळत आहे.

पोलीस यंत्रणा निक्रीय
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड दौरा अवघ्या काही तासावर येवून ठेपला आहे. त्यांचा दौरा असतानाही बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी थरकाप उडवून देणारी ठरत आहे. बीडची पोलीस यंत्रणा कुचकामी आणि निक्रीय झाल्यानेच गुन्हेगारी पोलीसावर भारी ठरत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या