बाप रे… बीडचे काय होणार? 1 टक्काही पाणी नाही

29

सामना ऑनलाईन । बीड

1972 चा दुष्काळ आठवतोय का? त्यापेक्षा कितीतरी पटीने भयंकर आणि विदारक दुष्काळाचा सामना यंदा बीड जिल्हा करतोय. संपूर्ण जिल्ह्यामध्ये गंभीर, बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. 1300 गावांमध्ये पाण्याच्या थेंबाथेंबासाठी झगडावे लागत आहे. टँकर गावात आले की अक्षरशः झुंबड उडते. हंडाभर पाणी मिळवण्यासाठी अख्खे कुटुंब टँकरकडे धाव घेते. बीड जिल्ह्यातील पाणीसंकट अधिक गडद होत आहे.

जिल्ह्यात केवळ 0.72 टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. गंभीर बाब म्हणजे 20 हजार हातपंप, 48 हजार विंधन विहिरी, 12000 आड, 7000 विहिरी आटल्या आहेत. 144 मध्यम आणि लघु प्रकल्पांपैकी 93 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

गावागावात स्थलांतर होत आहे.
बीड जिह्यामध्ये दुष्काळाच्या दुष्टचक्राचे संकट अधिक गडद होत आहे. मे महिन्यातला प्रत्येक दिवस रोज नवे आव्हान समोर उभे करत आहे. 1972 पेक्षाही कित्येक पटीने गंभीर दुष्काळाचा सामना सध्या बीड जिल्हा अनुभवत आहे. बीड जिह्यातील तब्बल 1300 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्याची संपूर्ण मदार फक्त आणि फक्त टँकरवर अवलंबून आहे.

अशी भयाण अवस्था

  • बीड जिह्यातील 144 मध्यम, लघु प्रकल्पांपैकी 93 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. 16 प्रकल्प शेवटच्या घटका मोजत आहेत. केवळ अप्पर कुंडलिका प्रकल्पामध्येच 42 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
  • बीड जिह्यातील 890 बंधाऱ्यात एक थेंबही पाणी शिल्लक राहिलेले नाही. नळ योजना बंद पडल्यानंतर संपूर्ण गावांची जी भिस्त घराघरात असणाऱ्या हातपंप, विंधन विहिरी, आड या सोर्सवर असते, ते सोर्स पहिल्यांदाच नष्ट झाले आहेत.
  • बीड जिह्यातील 20 हजार हातपंप, 85 हजार विंधन विहिरी, 12 हजार घराघरांतील आड, सात हजार शेतातील विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत.
  • पाऊस वेळेवर न झाल्यास बीड जिह्याची परिस्थिती यापेक्षाही भयावह होणार आहे. पाण्यासाठी वाडय़ा, वस्ती, गावे ओस पडणार आहेत. शहराचेही स्थलांतर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संकट निवारणासाठी उपाययोजना
बीड जिल्हय़ातील दुष्काळ अत्यंत भयंकर आहे. दूरदूरपर्यंत कुठेही पाण्याचा टिपूस नजरेला पडत नाही. प्रशासनाने दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी कंबर कसली आहे. बीड जिल्हय़ातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी 890 टँकर दिवसरात्र खेपा करत आहेत. 947 विहिरी, बोअर अधिग्रहण केले आहेत. 13 गावांमध्ये तात्पुरती पूरक नळ योजना सुरू केली आहे. 17 गावांमध्ये विशेष नळ योजना सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या