
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली या दिड हजार लोकवस्तीच्या गावास खेटून सिंदफणा नदी वाहते व ती पुढे जाऊन मंजरथ येथे गोदावरी नदीस मिळते. सध्या सिंदफणा नदी पात्रात ८५ हजार क्युसेसने विसर्ग सुरू असल्याने ती काठोकाठ भरून वाहत आहे. तसेच गोदावरी नदीदेखील तुडूंब भरून वाहत असल्याने, सांडस चिंचोली गावाला पूराचा वेढा पडला आहे. नदीपात्रातून बाहेर आलेल्या पाण्याने गावांना बेटाचे स्वरूप आले आहे.
गावचा संपर्क तुटलेला आहे. आपत्कालीन परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून गटविकास अधिकारी जोस्तना मुळीक यांनी अलीकडील गाव देपेगांव येथून चिंचोली गावकऱ्यांशी संपर्क ठेवला आहे. यापूर्वी या गावात १९९१ व २००५ साली आपत्कालीन परिस्थितीत लष्कराच्या सहाय्याने लोकांना मदतकार्य राबवण्यात आले होते. आता आम्ही सर्व परस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून गावकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले आहे.





























































