
उत्तर प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नवीन विमानतळांचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र आता त्यापैकी 6 देशांतर्गत आणि 1 आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे बंद झाली आहेत. या विमानतळांवर प्रवाशांची कमतरता, संचालनाशी संबंधित अडचणी आणि संपर्क सुविधा नसल्यामुळे उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे या विमानतळांवर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या विमानतळांमध्ये आझमगढ, अलीगढ, मोरादाबाद, श्रावस्ती, सहारणपूर, कुशीनगर आणि चित्रकूट या विमातळांचा समावेश आहे. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे. बुंदेलखंडमधील पहिले विमानतळ चित्रकूट विमानतळ येथून लखनऊसाठीच्या उड्डाणांना 12 मार्च 2024 रोजी सुरुवात झाली होती. एअरबिग” कंपनी या उड्डाणांचे संचालन करत होती, पण 16 डिसेंबर 2024 पासून ही उड्डाणे बंद करण्यात आली. विमानतळ संचालक आलोक सिंह यांच्या मते, संचालनाशी संबंधित अडचणी आणि दृश्यमानतेच्या (visibility) समस्येमुळे कंपनीने उड्डाणे थांबवली. सध्या विमानतळावर 70 कर्मचारी कार्यरत आहेत, पण कोणतेही विमान उड्डाण करत नाही.
20 ऑक्टोबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले होते. या प्रकल्पावर सुमारे 260 कोटी रुपये खर्च झाले, परंतु 47 महिने उलटून गेल्यानंतरही आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होऊ शकली नाहीत. दिल्ली–कुशीनगर फ्लाइटही 7 नोव्हेंबर 2023 रोजी बंद झाली. विमानतळ संचालक प्रणेश कुमार रॉय यांच्या म्हणण्यानुसार, विमानतळावर इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) बसवता आली नाही कारण 6 घरांशी संबंधित जमीन प्रकरण न्यायालयात अडकले होते, जे आता निकाली निघाले आहे. याशिवाय प्रवाशांची कमी संख्याही मोठे कारण ठरली.
श्रावस्ती जिल्ह्यात ना रेल्वे स्टेशन आहे, ना सरकारी बसस्थानक, तरीसुद्धा येथे विमानतळ उभारण्यात आला. उद्घाटनानंतर लखनऊसाठी 19-सीटर विमानसेवा सुरू करण्यात आले होते. परंतु रस्त्याने फक्त तीन तासांत लखनऊ पोहोचता येते, त्यामुळे प्रवाशांची संख्या अत्यंत कमी राहिली आणि अखेर ही उड्डाणे बंद करण्यात आली.




























































