पुतीन भेटीआधी मोदींची झेलेन्स्की यांच्याशी चर्चा

शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी भेट होणार आहे. त्या भेटीआधीच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आज मोदींशी फोनवर चर्चा केली. युक्रेन-रशियामधील संघर्षावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. ‘रशिया व युक्रेनचे युद्ध थांबून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी हिंदुस्थान सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन मोदींनी झेलेन्स्कींना दिले.

झेलेन्स्की काय म्हणाले?

झेलेन्स्की यांनीही नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेला दुजोरा दिला. ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपियन नेत्यांशी झालेल्या चर्चेचा तपशील मोदींच्या कानावर घातला. आम्ही रशियाशी चर्चेला तयार आहोत, मात्र दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही रशियाकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही,’ हेही त्यांनी मोदींच्या निदर्शनास आणले.