
कर्नाटक राज्यातील बेळगाव (बेलागावी) येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीमंत पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश झाला आहे. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने 33 वर्षीय दीपा आवतागी हिला अटक केली असून, ती मूळची बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरची रहिवासी आहे. व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या दीपाने इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून ‘हनीट्रॅप’ स्टाईलने अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, दीपा सोशल मीडियावर प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या सधन आणि प्रभावशाली पुरुषांना लक्ष्य करत असे. त्यांना विश्वासात घेऊन मैत्रीपूर्ण संवाद साधून ती समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायची. एकदा मैत्री घट्ट झाली की, ती संबंधितांना हॉटेल किंवा लॉजवर भेटीसाठी बोलवायची. पीडित व्यक्ती लॉजवर आल्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून ती त्यांना फ्रेश होण्यासाठी किंवा आंघोळीसाठी बाथरूममध्ये पाठवायची. व्यक्ती आत जाताच ती त्यांचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करायची.
धक्कादायक बाब म्हणजे, चोरी केल्यानंतरही दीपाचे कारनामे थांबत नसत. ती पीडितांना फोन करून त्यांचे सामान आणि वाहन परत करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करायची. जर कोणी पैसे देण्यास नकार दिला, तर ती त्यांना खोट्या पोलीस तक्रारीत अडकवण्याची आणि सामाजिक बदनामी करण्याची धमकी द्यायची. या भीतीपोटी अनेक पीडितांनी पोलिसांकडे न जाता तिची मागणी मान्य केली, ज्यामुळे हे रॅकेट दीर्घकाळ सुरू राहिले. अखेर तक्रार प्राप्त होताच टिळकवाडी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करून दीपाला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात तिला हुक्केरी येथील शिवानंद मातापती हा साथीदार मदत करत असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

























































