जिगरबाज बेल्जियमने रोखली ब्राझीलची सांबा दौड;’माजी विजेत्यांचे ‘पॅकअप’

सामना ऑनलाईन | कझान 

फुटबॉल विश्वात ‘रेड डेव्हिल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोकादायक बेल्जियमने २१व्या फुटबॉल विश्वचषकात ५ वेळा फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या माजी जगजेत्या ब्राझीलची सांबा दौड २-१अशा गोलने रोखली. शुक्रवारी रात्री कझान येथे खेळविण्यात आलेल्या वर्ल्डकप उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमने मोठा उलटफेर घडवत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. आता त्यांची गाठ उरुग्वेला २-० असे पराभूत करणाऱ्या माजी विजेत्या फ्रान्सशी पडणार आहे. या लढतीत सेल्फ गोल करणारा ब्राझीलचा मध्यरक्षक फर्नांडिन्हो माजी विजेत्यांसाठी खलनायक ठरला.

यंदा पुन्हा फिफा विश्वचषकात ब्राझीलचा सांबा डान्स पाहायला मिळेल अशी जगभरातील फुटबॉलशौकिनांची अपेक्षा होती. पण ”रेड डेव्हिल” बेल्जियमने बलाढ्य ब्राझीलच्या मानगुटीवर बसून त्यांना स्पर्धेबाहेर काढले. फ्रान्स आणि बेल्जियम या युरोपिअन संघानी दक्षिण अमेरिकन संघांची मक्तेदारी मोडून काढत यंदाच्या विश्वचषकात मोठी सनसनाटी निर्माण केली. लढतीच्या सुरुवातीला आपला आक्रमक पवित्रा दाखवणारा ब्राझील संघ नंतर मात्र बेल्जियन आक्रमणांच्या दबावात आला. त्यातच १३व्या मिनिटाला ब्राझिलियन मध्यरक्षक फर्नांडिन्हो याच्या खांद्याला लागून बॉल ब्राझीलच्याच गोलजाळ्यात गेला आणि ब्राझीलच्या दुर्दैवाच्या दशावताराला प्रारंभ झाला. त्यानंतर ३१व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूने रचलेल्या चालीवर डी ब्रुयनेने बेल्जियमसाठी दुसरा गोल नोंदवला. २-० अशा आघाडीनंतर बेल्जियन खेळांडूंचा आत्मविश्वास शतगुणित झाला होता आणि पिछाडीवर पडलेल्या ब्राझीलचे स्टार चकवा खाल्ल्यासारखे अनेक सोप्या संधीही वाया घालवत होते. सुदैवाने ७६ व्या   मिनिटाला रेनाटो ऑगस्तोने  हेडरने गोल करीत ब्राझीलचे लढतीतील गोलाचे खाते उघडले.ब्राझीलचा सुपरस्टार नेमार या लढतीत पार निष्प्रभ ठरला.त्याने अनेक संधी वाया दवडल्या.

उपांत्य फेरीत सबकुछ युरोपिअन असा मामला

२१व्या फिफा विश्वचषकाच्या ४ उपांत्य लढतींत आता सबकुछ युरोपिअन असा मामला रंगणार आहे. फ्रान्स आणि बेल्जिअमने सेमीफायनल गाठली आहे. आता पुढच्या उपांत्यपूर्व लढतींत रशिया विरुद्ध क्रोएशिया आणि स्वीडन विरुद्ध इंग्लंड असे युरोपिअन संघच एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप युरोप खंडातच जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. बेल्जियमने १९८६ नंतर दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.