
राज्य शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेला सध्या ‘ई-केवायसी’ प्रक्रियेचा अडथळा निर्माण झाला असून, अनेक पात्र महिलांचे हप्ते थांबले आहेत. ग्रामीण भागातील महिलांना दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ डिसेंबर महिन्यापासून बंद झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना या योजनेतून दरमहा 1500 इतका लाभ थेट बँक खात्यात जमा केला जात होता. पारदर्शकता आणि नियमितता राखण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडले किंवा प्रक्रिया पूर्ण केली नाही. परिणामी त्यांचा लाभ थांबला आहे.
पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत संधी देण्यात आली असली, तरी यापूर्वी नियमित लाभ घेत असलेल्या अनेक महिलांनी नवीन ई-केवायसी पूर्ण केली नसल्याने त्यांचे डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांचे हप्ते जमा झालेले नाहीत.
अनेक आर्थिकदृष्टय़ा दुर्बल महिलांना केवळ ई-केवायसी प्रक्रियेअभावी लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शासनाला फक्त मतदानापुरतीच लाडक्या बहिणींची आठवण येते का? ई-केवायसी पूर्ण केली नाही तर आम्ही सावत्र बहिणी आहोत काय, असा संतप्त सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महिला व बालविकास विभागाने ई-केवायसीसाठी पुन्हा एकदा वेबपोर्टलवर संधी उपलब्ध करून द्यावी किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत ही प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माझ्या खात्यात यापूर्वी दर महिन्याला 1500 रुपये येत होते. गेल्या तीन महिन्यांपासून एक रुपयाही आलेला नाही. मागील महिन्यात सेतूचालकाकडे गेले असता, केवायसीची मुदत संपली असल्याचे सांगण्यात आले.
— शोभा पवार, खडांबे.
ई-केवायसी पूर्ण न केलेल्या अनेक महिला दररोज माझ्याकडे येतात. त्यांच्या खात्यात पैसे आले नसल्याची तक्रार करतात. मात्र, शासनाने सध्या नवीन ई-केवायसी प्रक्रिया बंद ठेवून फक्त दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध केला आहे. हे सांगताना महिलांचा प्रचंड संताप दिसतो.
— नितीन गांधले, सेतू चालक, वांबोरी

























































