पत्नीकडून पतीवर लैंगिक अत्याचार, मैत्रीणींशीही शारिरिक संबंध ठेवण्याचा पत्नीकडून दबाव; पतीची पोलिसांत धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पतीकडून पत्नीवर अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असताना, याउलट एका प्रकरणात पतीनेच आपल्या पत्नीवर लैंगिक छळ, मानसिक अत्याचार आणि अप्राकृतिक कृत्यांसाठी भाग पाडल्याचे गंभीर आरोप केले आहेत. बेंगळुरूतील 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या 31 वर्षीय पत्नीविरुद्ध अमृतहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे.

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीने त्याला तिच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वारंवार दबाव टाकला. तसेच पत्नी त्याला अश्लील व्हिडिओ पाठवून त्यातील कृत्यांची पुनरावृत्ती करण्यास भाग पाडत होती. एवढेच नव्हे, तर ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत असल्याचाही आरोप पतीने केला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पत्नीने आपल्या भूतकाळातील आणि सध्याच्या संबंधांबद्दलही कबुली दिली आहे. पत्नीला आपल्याकडे तिचा जीवनशैली सांभाळण्याइतका पैसा नसल्याची भावना होती. ती दारू प्यायची, त्याने विरोध केल्यानंतरही ती मित्रांसोबत वेळ घालवत असे, असेही तक्रारीत नमूद आहे. या वादांमुळे 4 जुलै 2024 रोजी कुटुंबीयांच्या उपस्थितीत मध्यस्थी करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही कथित छळ सुरूच राहिल्याचा दावा पतीने केला आहे.

तसेच तक्रारदाराने आपल्या सासरच्या मंडळींवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करून धमक्या दिल्या, तसेच खोट्या कारणांवरून त्याला स्वतःच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पतीने असा दावा केला आहे की, त्याने पत्नीला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने दिले होते, मात्र ते अद्याप परत करण्यात आलेले नाहीत. याशिवाय त्याचा पासपोर्ट, शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर वैयक्तिक वस्तूही पत्नीच्या घरातच असल्याचे त्याने सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणाला आणखी वळण देत संबंधित पत्नीनेही पतीविरुद्ध काही गंभीर आरोप करत तमिळनाडूमध्ये एफआयआर दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयातही खटला सुरू असून, त्याच्या आधारेच बेंगळुरूमध्ये ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.