
भांडुप पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन रोडवर सोमवारी रात्री थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. बेस्ट बस रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊजण जखमी झाले. जखमींवर राजावाडी व अन्य एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भांडुप रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस रेल्वे, बस व रिक्षा प्रवाशांची सतत ये-जा सुरू असते. त्याशिवाय बाजार असल्यामुळे इतर रहिवाशांचीही मोठी गर्दी असते. अशा गर्दीच्या वेळी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नेहमीप्रमाणे तिथे आलेली बस मागे घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस अत्यंत वेगात मागे आली. त्याखाली अनेक लोक चिरडले गेले. या घटनेमुळे स्टेशन परिसरात आरडाओरडा आणि घबराट उडाली. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे, तर जखमींमध्ये एक महिला व 8 पुरुष आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कुर्ल्यातील भयानक अपघाताच्या आठवणी ताज्या
मागील वर्षी कुर्ला येथील एसजी बर्वे मार्गावर असाच अपघात झाला होता. त्यावेळी बेस्ट बसने अनेक पादचारी व 22 वाहनांना उडवले होते. त्यात नऊजणांचा मृत्यू झाला होता, तर 42 जण जखमी झाले होते. भांडुपमधील घटनेमुळे त्या भयानक अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.
शिवसैनिकांचा मदतीचा हात
भांडुप अपघातातील जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे कळताच शिव आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्यासह सचिन भांगे, चंद्रकांत हळदणकर यांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींवरील उपचारात अडथळा येत नाही ना याची माहिती घेतली. तसेच, रुग्णालय प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य केले.
बसचालक ताब्यात, चौकशी सुरू
हा अपघात नेमका कसा घडला, चूक नेमकी कोणाची होती? चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अनर्थ घडला की बस मागे घेताना वाहक उपस्थित नसल्याने हा प्रकार घडला याची माहिती मिळू शकलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच भांडुप पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, बेस्ट बसचे कर्मचारी व 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

































































