
जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्याच समाजाचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, मग मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मला आश्चर्य वाटतं की या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्याच समाजाचे ते नेते आहेत. विशेषतः हे एकनाथ शिंदे हे नवी मुंबईत जरांगे पाटील यांच्यासोबत गुलाल उधळायला होते. पण काल ते कुठे दिसले नाहीत, याचे कारण काय?
महाराष्ट्राच्या राजधानीतला हा गंभीर विषय होता. अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानी सर्वांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, मुंबई संदर्भात त्याबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. हायकोर्टात सुनावणी सुरू होती, अशा वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हवे होते. म्हणून त्यांनी मुंबईतच थांबणं गरजेचं होतं. स्वतः फडणवीस हे या वाटाघाटीत गुंतले होते हे मला माहित आहे. कालचं संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीसांचं आहे. आणि या संदर्भात त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी जरांगे पाटील आणि आंदोलकांना अपशब्द वापरले त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते, या आनंद सोहळ्यात कुठे होते? की त्यांना हा आनंद सोहळा मान्य नव्हता आणि हे प्रकरण चिघळत रहावं, देवेंद्र फडणवीस अडचणीत यावे असं काही योजना दुसरे लोक करत होते का, हे काल प्रकर्षानं जाणवलं असेही संजय राऊत म्हणाले.