
नवी मुंबई शहरातील पालिकेच्या मराठी शाळा बंद करण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातल्यामुळे शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक आक्रमक झाले. या प्रस्तावाच्या विरोधात या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात ‘नवी मुंबईतील पालिका शाळा बंद कराल तर खबरदार’ असा इशारा देत जोरदार निदर्शने केली. या प्रस्ताववर सभागृहात चर्चा सुरू असताना विरोधकांनीही कडाडून विरोध केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात सुमारे ८० शाळा चालवल्या जातात. त्यामध्ये ५७ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या सर्वच मराठी शाळांचे रूपांतर इंग्रजी शाळांमध्ये करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने पटलावर मांडल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली. सर्वच स्तरातून या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्यात आला.
भाजपच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातील आमदार मंदा म्हात्रे यांनीही या प्रस्तावाला विरोध केला. मराठी शाळा बंद न करता दोन्ही माध्यमांची शिक्षण व्यवस्था कायम ठेवावी अशीही मागणी त्यांनी केली. याच निर्णयाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महापालिकेतील गटनेते विशाल ससाणे, नगरसेवक विशाल विचारे आणि मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी पालिका मुख्यालयात आज निदर्शने केली. मनमानी पद्धतीने आणण्यात आलेल्या या ठरावाच्या विरोधात या तिन्ही नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे मुख्यालयाचा सर्व परिसर दणाणून गेला.
सभागृहात या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षातील अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. हा निर्णय मराठी भाषेची गळचेपी करणारा असल्याचा आरोपही यावेळी नगरसेवकांनी केला. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही भाजपच्या या प्रस्तावाला विरोध होत असला तरी सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. या मनमानी कारभाराच्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.





























































