पुन्हा एकदा फरहान अख्तरचा ‘भाग मिल्खा भाग’ अवतरणार मोठ्या पडद्यावर

फरहान अख्तर स्टारर सुपर-डुपर हिट चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार आहे. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. पीव्हीआर-आयएनओएक्सने ‘भाग मिल्खा भाग’ पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. देशभरातील निवडक पीव्हीआर थिएटरमध्ये हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. फरहान अख्तर आणि सोनम कपूर यांचा हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर येत्या 18 जुलै रोजी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा चित्रपट बघता येणार आहे.

फरहान अख्तरने या चित्रपटामध्ये प्रख्यात धावपटू मिल्खा सिंगची भूमिका साकारण्यासाठी शारीरिक मेहनत घेतलेली प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. तसेच चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार म्हटल्यावर, फरहानने एका निवेदनात म्हटले आहे की, “मिल्खा सिंगची भूमिका साकारणे हा एक सन्मान आणि जबाबदारी दोन्ही होते. प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळेल याबद्दल मी आभारी आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि व्हायकॉम 18 स्टुडिओ आणि आरओएमपी पिक्चर्स निर्मित, हा चित्रपट खेळाडू मिल्खा सिंगचा हिंदुस्थानातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंवर आधारीत जीवनपट होता. मिल्खा सिंग यांना ‘फ्लाइंग शीख’ म्हणून ओळखले जाते. फरहान आणि सोनम व्यतिरिक्त, चित्रपटात दिव्या दत्ता आणि प्रकाश राज देखील आहेत. हाच चित्रपट 40 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा व्यवसाय केला होता.