
हिंदुस्थानी लष्करात आता नव्या दमाची भैरव कमांडो बटालियन मैदानात उतरणार आहे. 1 नोव्हेंबरपासून ही बटालियन मैदानात उतरणार असल्याने शत्रूंना आतापासूनच धडकी भरली आहे. सुरुवातीला यामध्ये एकूण पाच बटालियन बनवली जाणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक बटालियनमध्ये 250 प्रशिक्षित आणि आधुनिक शस्त्र असलेले कमांडो असणार आहेत. हे कमांडो पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात केले जाणार आहेत.
सुरुवातीला यामध्ये एकूण पाच बटालियन बनवली जाणार आहे. ज्यामध्ये तीन बटालियन उत्तर भारतातील लेह (14 कोर), श्रीनगर (15 कोर) आणि नागरोटा (16 कोर) तैनात केले जातील. उर्वरित दोन बटालियन या पश्चिम आणि पूर्व सीमेवर तैनात केल्या जातील. भविष्यात एकूण 23 बटालियन बनवण्याची योजना आहे. नव्या भैरव लाइट कमांडो बटालियनसोबत रुद्र ब्रिगेडची 31 ऑक्टोबरपर्यंत पाच युनिट पूर्णपणे तयार केली जातील. या कमांडोंना स्पेशल फोर्सेजसोबत खास प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना नाइट व्हिजन उपकरण, ड्रोन आणि हायटेक कम्युनिकेशन सिस्टमची जबाबदारी सोपवली जाईल. रुद्र ब्रिगेड ही हिंदुस्थानी लष्करातील पहिली ऑल आर्म्स ब्रिगेड आहे. ज्यात पायी चालणे, मॅकेनाइज्ड इन्फेंट्री, टँक, आर्टिलरी, स्पेशल फोर्सेज, ड्रोन युनिट्स हाताळणे यामुळे ही ब्रिगेड मल्टी डोमेन वॉरफेयरवर काम करेल.
25 ऐवजी 75 टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम नोकरी मिळणार
सैन्यदलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अग्निवीरांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. आता 25 टक्के ऐवजी 75 टक्के लोकांना सैन्यात कायमस्वरूपी नोकरीची हमी दिली जाईल. आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स आज जैसलमेरमध्ये सुरू होत आहे. यामध्ये अग्निवीरांचा रिटेनशन रेट सध्याच्या 25 टक्यांवरून 75टक्केपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ असा की पूर्वी 100 पैकी 25 अग्निवीरांना सैन्यात भर्ती केले जायचे, परंतु आता 100 पैकी 75 जणांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स ही तिन्ही सेवांमध्ये एकजूट वाढवण्याच्या उपाययोजना आणि मिशन सुदर्शन चक्राच्या अंमलबजावणीचा आढावा या विषयांवर आहे. यात अग्निवीर प्रस्तावालाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी पुढील वर्षी त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.
























































