अत्याचारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली आहे. फिर्यादी महिलेने न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने मुरकुटेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. मुरकुटे सध्या आजारी असून, त्यांच्यावर नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात पोलीस तसेच सरकारी पक्षाच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले. गुह्यातील फिर्यादी स्वतः न्यायालयात उपस्थित राहिल्या. त्यांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. त्यावर न्यायालयाने दोन दिवसांची मुदत देऊन सुनावणी पुढे ढकलली आहे. न्या. एस. व्ही. सहारे यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात राहुरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदित्य शिंदे यांनी मुरकुटे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुरकुटे यांना रक्तदाबाचा त्रास जाणवला होता. त्यामुळे त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना सिव्हिल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. न्यायालयात मुरकुटे यांच्या वतीने विधिज्ञ सुमित पाटील, महेश तवले, सुभाष चौधरी, ऋषिकेश बोर्डे हे काम पाहत आहेत. पीडितेने दिलेल्या पुराव्यांची पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे.