दणदणीत शुभारंभ… ‘सुपर डुपर’ उत्साह, अखेर भारतमाता सुरू, मराठी माणसाला मिळाले हक्काचे चित्रपटगृह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘मराठी चित्रपटांचे माहेरघर’ असलेले लालबागचे भारतमाता चित्रपटगृह मागील सहा वर्षे बंद होते. ‘भारतमाता’ कधी सुरू होणार, असा प्रश्न गिरणगावातील प्रेक्षकांना पडला होता. अखेर ही प्रतीक्षा आज संपली. ‘सुपर डुपर’ या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोने भारतमाता चित्रपटगृहाचा पडदा उघडला. पुन्हा त्याच टाळय़ा, शिट्टय़ा आणि तोच जोश! भारतमाता दणाणून गेले! मराठी प्रेक्षक आणि कलाकार सुखावले, नॉस्टेल्जिक झाले… भारतमाता आणि मराठी चित्रपट या वैभवशाली परंपरेचे आज पुनरुज्जीवन झाले!

भारतमाता थिएटर नूतनीकरणानंतर सुरू झाले आहे. मल्टिप्लेक्सच्या जमान्यात सिंगल स्क्रीनला उतरती कळ लागलेली ‘भारतमाता’च्या रूपाने मराठी चित्रपटांसाठी हक्काचे थिएटर उभे राहिले आहे. झी टॉकीज निर्मित ‘सुपर डुपर’ या सिनेमाच्या प्रीमियरने गुरुवारी उद्घाटन सोहळा पार पडला. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी ‘भारतमाता’चे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकर, भारतमाताचे व्यवस्थापकीय भागीदार कपिल भोपटकर, अभिनेत्री निर्मिती सावंत, ऋषिकेश जोशी, ललित प्रभाकर, लेखक समीर पाटील, निर्माते विजय शिंदे आदी उपस्थित होते.

सहा वर्षांनंतर मराठी चित्रपटप्रेमींची पावले थिएटरकडे वळली. त्यांचे रेड कार्पेट घालून स्वागत झाले. ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला आलेल्या रसिकांना जुनी परंपरा आणि आधुनिक सुविधांचा संगम अनुभवला. डॉल्बी सराऊंड साऊंड, 2 के लेझर प्रोजेक्शन तंत्र, अत्याधुनिक स्नॅक कॉर्नरने प्रेक्षकांना चकित केले. आतील मऊ आणि आरामदायी पुशबॅक सीट्स बघून अनेकांना जुन्या लाकडी खुर्च्या आठवल्या. प्रेक्षकांना सिंगल स्क्रीनमध्ये मल्टिप्लेक्सचा अनुभव घेता आला. अनेक जण दादा काsंडपेंच्या सिल्व्हर ज्युबिली चित्रपटांच्या आठवणीत रमले, तर कुणी मोठय़ा बॅनर्समध्ये रमले.

माहेर–आजोळच्या आठवणी दाटून आल्या…

‘सुपर डुपर’ चित्रपटातील अभिनेत्री निर्मिती सावंत आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, माझे माहेर बीडीडी चाळीचे. त्यामुळे भारतमाता हे माझे माहेरचे थिएटर आहे. आज माझ्या चित्रपटाने या नूतनीकरण झालेल्या ऐतिहासिक वास्तूचा शुभारंभ होतोय याचा आनंद वाटतोय. आमचा ‘सुपर डुपर’ चित्रपट तुमच्या हाती देतोय.

 मंत्री आशीष शेलार म्हणाले की, माझे आजोळ लालबाग असल्याने मी आईसोबत या सिनेमागृहात सिनेमा पाहिला, त्याच्या आठवणी आज ताज्या झाल्या. माझ्यासारख्या असंख्य मराठी माणसाच्या आठवणी या सिनेमागृहाशी जोडलेल्या आहेत. हा भारतमाता नाकासुद्धा चळवळी आणि आंदोलनाचे पेंद्र होते. ‘भारतमाता’मध्ये उभा असताना मोठा भूतकाळ डोळय़ांसमोर उभा राहतोय.