प्रतीक्षा संपली! ‘भारतमाता’ सिनेमागृहाचा पडदा उघडला 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिनेरसिकांची प्रतीक्षा अखेर संपली असून मंगळवारपासून लालबागमधील आयकॉनिक भारतमाता सिनेमागृहाचा पडदा उघडला आहे. पिढय़ान्पिढय़ा प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये असलेले हे सिनेमागृह नूतनीकरणांनंतर आता नव्या रूपात भेटीला आले आहे. यानिमित्ताने पारंपरिक सिनेमा अनुभवासोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि हायटेक सुविधा प्रेक्षकांना मिळणार आहेत.

लालबाग-परळसह मराठी रसिकांच्या गळय़ातील ताईत असलेले आणि ‘मराठी सिनेमाचे माहेरघर’ अशी ओळख असलेले भारतमाता सिनेमागृह  2018 पासून नूतनीकरणासाठी बंद होते. नूतनीकरण करताना भारतमाताची जुनी ओळख हरवणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. हे सिनेमागृह आता वन सिनेमाजने, ‘मुक्ता A2’ सिनेमाजच्या सहकार्याने पुन्हा सुरू केले आहे.  यानिमित्ताने आजच्या प्रेक्षकांनाही सिंगल स्क्रीनचा अनुभव घेता येईल.

भारतमाता सिनेमागृहाचे मुंबईकरांच्या मनात खास स्थान आहे. हे सिनेमागृह पुन्हा सुरू करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून यानिमित्ताने आम्हाला सिंगल स्क्रीन सिनेमांची परंपरा पुन्हा जिवंत करायची आहे, असे वन सिनेमाजचे रजत हक्सर म्हणाले.

अशा असणार सुविधा

नव्या भारतमाता सिनेमागृहात डॉल्बी सराऊंड साऊंड, 2K लेझर प्रोजेक्शन, लक्झरी रिक्लायनर आणि सोफा सीटिंग उपलब्ध आहे. तसेच फूड आणि बेव्हरेज अनुभवही सुधारण्यात आला आहे. या सर्व बदलानंतरही सिनेमाची जुनी ओळख आणि नॉस्टॅल्जिक वातावरण जपले गेले आहे.