सत्तेतच काय विरोधातही दिसणार नाही! रावणाचे भाजपला ओपन चॅलेंज

16

सामना ऑनलाईन, सहारनपूर

अखेर रावणाची सुटका झाली असून जेलमधून बाहेर येताच त्याने आपण भाजपचा असा पराभव करू की ते सत्तेतच काय विरोधातही दिसणार नाही असे विधान केले आहे. भीम आर्मी नावाची संघटना उभी करणाऱ्या चंद्रशेखर आझाद उर्फ रावणची सहारनपूर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. २०१७ साली जातीय दंगल भडकवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश पोलिसांतर्फे चंद्रशेखर आझादच्या सुटकेबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय ज्यात म्हटलंय की त्याच्या आईच्या विनंतीवरून त्याची लवकर सुटका करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण जाणणाऱ्यांनी म्हटलंय की रावणाच्या सुटकेने जास्त त्रास भाजपला नाही तर मायावती यांच्या बसपला होणार आहे. भीम आर्मीच्या स्थापनेनंतर उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडच्या भागात बसपला जबरदस्त फटका बसला आहे. येणाऱ्या काळात जसजशी ताकद वाढत जाईल तसतसा रावण हा मायावतींसाठी डोकेदुखी बनणार आहे.

चंद्रशेखर आझाद याला आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने जिग्नेश मेवाणीद्वारे बरेच प्रयत्न केले आहेत. उत्तर प्रदेशातील महाआघाडीमध्येही त्याला आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे. काँग्रेसला यात यश मिळू नये म्हणून भाजपने चंद्रशेखर आझादची सुटका केल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. ११ महिने त्याला तुरुंगात ठेवता येणं शक्य होतं, मात्र ९ महिन्यानंतर त्याला केंद्र सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात काही गडबड होऊ नये तसेच काँग्रेसच्या राजकारणावरही मात करता यावी यासाठी चंद्रशेखर आझादची लवकर सुटका करण्यात आल्याचं बोललं जातंय. लवकर सुटका झाल्याने भाजप आपल्याला दलितांप्रती किती सहानुभूती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करेल यात काहीच शंका नाहीये, मात्र रावणाने तुरुंगातून सुटताच भाजपला आव्हान दिल्याने त्यांच्या गोटात थोडी चलबिचल झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या