
भीमा नदी खोऱ्यात मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. याच ऊस पिकात भीमा नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे ऊस पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. उसाबरोबर केळी व इतर पिकेदेखील पाण्याखाली गेली आहेत. पाण्यात बुडालेल्या पिकांची नासाडी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे बांध, शेताचे भराव वाहून गेले आहेत. आता नदीचा पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
उजनी व वीर धरणातून भीमा (चंद्रभागा) नदीत मोठय़ा प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. सध्या विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे धोक्याच्या पातळीवरून वाहणारी भीमा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उघडे झाले असून, त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. तर, शेती पिकात शिरलेले पाणीदेखील ओसरून गेले आहे. पाणी कमी झाल्याने पिके उघडी पडू लागली आहेत.
पंढरपूर येथे 1 लाख 90 हजार क्युसेकचा विसर्ग आल्यामुळे भीमा नदीपात्रापासून पाच किमीपर्यंत शेतात पाणी शिरले होते. देगाव व अर्जुनसोंड येथील ओढय़ाद्वारे पाच किमीपर्यंत पाणी शेतात शिरले आहे. या पाण्याने शेती पिकांची नासाडी झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या गंजी, ढेपणी वाहून गेल्या आहेत. तर, नदीकाठच्या गावातील अनेक घरात पाणी शिरल्याने पडझड झाली आहे. शेतातील बांध वाहून गेले आहेत. नदीकाठच्या शेताची माती वाहून गेली आहे. त्यामुळे ऊस व केळी पिकासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
घरांचेही पंचनामे करा
पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण परिसर, व्यासनारायण झोपडपट्टी तसेच संत पेठ येथील मिळून 134 घरांत पाणी शिरले. तर, 543 लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. तसेच ग्रामीण भागातील 35 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 171 लोकांना स्थलांतरित करावे लागले होते. एकूण 169 घरांचा पंचनामा करावा लागणार आहे.
ज्या ठिकाणचे पाणी कमी झाले आहे तेथील नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. पाणी कमी होताच सर्वच पंचनामे करण्यात येणार आहेत. नदीवरील सर्व बंधाऱ्यांवरून वाहतूक सुरू झाली आहे.
– सचिन लंगुटे, तहसीलदार, पंढरपूर
भीमा नदीकाठच्या पिराची कुरोली, वाडीकुरोली, शेळवे, खेडभाळवणी, कौठळी, व्होळे, खेडभोसे, देवडे, पटवर्धन कुरोली, आव्हे, पेहे, सांगवी, बादलकोट, उंबरे, करोळे, कान्हापुरी गावांतील पूर परिस्थितीची पाहणी केली असून, नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
– अभिजित पाटील, आमदार