
गजलनवाझ पंडित भीमराव पांचाळे यांच्या गजल गायनाच्या कारकीर्दीतील, सुवर्णमहोत्सवी वर्षातील मराठी-उर्दू गजलांची बहारदार मैफल शनिवारी रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या वेळी त्यांना त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची साथ लाभली.
भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या कारकीर्दीतील रौप्यमहोत्सवी मैफल जिथे रंगली होती, त्याच शिवाजी मंदिरात सुवर्ण महोत्सवी मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या सुवर्णमहोत्सवी मैफलीत पांचाळे यांनी ‘अंदाज आरशाचा’, ‘आयुष्य तेच आहे’, ‘तू नभातले तारे माळलेस का तेव्हा’, ‘मी किनारे सरकताना पाहिले’, ‘हा असा चंद्र’, ‘करते थोडी स्वप्ने गोळा’ अशा अनेक लोकप्रिय गझलांसह नव्या गझलाही सादर केल्या. भीमराव पांचाळे यांची पहिली गझल मैफल 1972 साली अकोल्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मागील 50 पन्नास वर्षे अथकपणे महाराष्ट्रासह देश-विदेशांत गझल गायनाचे कार्यक्रम केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी ‘गझल सागर प्रतिष्ठान’ची स्थापना करून आतापर्यंत 10 अखिल भारतीय गझल संमेलने आयोजित केली.