
भिवंडी शहरातील कामतघर परिसरात असलेल्या बालाजी डाईंग या कपड्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला शुक्रवारी भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत कंपनीची दोन मजली इमारत अक्षरशः जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नसून तब्बल आठ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
बालाजी डाईंग या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कच्चा माल, रंग साहित्य व केमिकल साठवले होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या कंपनीला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केल्यानंतर आठ तासांनी अग्निशमक दलाला यश आले. या कंपनीत मोठ्या प्रमाणावर केमिकल साठवले असल्याने आग भडकली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. दरम्यान आग नक्की कशामुळे लागली त्याचं कारण अजून स्पष्ट झालेले नसून कंपनीतील कोट्यवधी रुपयांची सामग्री जळून खाक झाली आहे.
 
             
		




































 
     
    





















